World Cup 2023 साठी टीम इंडियाची घोषणा केव्हा? Ajit Agarkar यांनी सांगितली तारीख
Icc World Cup 2023 Team India Squad | आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धा भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने प्राथमिक संघ जाहीर केला आहे.
नवी दिल्ली | बहुप्रतिक्षित आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी कॅप्टन रोहित शर्मा याच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर 17 खेळाडूंची नावं पत्रकार परिषदेत झपझप वाचून दाखवली. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियात तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा या दोघांना संधी देण्यात आली आहे. तर श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह हे टीम इंडियाचे 3 हुकमी एक्के परतले. तर शिखर धवन, आर अश्विन आणि युझवेंद्र चहल या तिघांना स्थान मिळालं नाही.
आशिया कपला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेत एकूण 13 सामने हे श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये पार पडणार आहेत. या आशिया कपनंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात वनडे सीरिज होणार आहे. तर त्यानंतर 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने प्राथमिक संघ जाहीर केला. आता आशिया कपनंतर वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा करणार हा असंख्य क्रिकेट चाहत्यांना प्रश्न पडलाय.
निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांना पत्रकार परिषदेत नेमका हाच प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा आगरकर यांनी कोणत्या तारखेला वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची निवड करणार याचं उत्तर दिलं. वर्ल्ड कपसाठी 5 सप्टेंबरला वर्ल्ड कप टीम जाहीर केली जाईल, असं अजित आगरकर यांनी म्हटलं. आयसीसीने सर्व एकूण 10 संघांना 5 सप्टेंबरपर्यंत आपल्या 15 सदस्यीय संघाची नाव पाठवायला सांगितली आहेत. त्यानुसार बीसीसीआय शेवटच्याच दिवशी म्हणजेच 5 सप्टेंबरलाच भारतीय संघ जाहीर करेल.
दरम्यान वर्ल्ड कप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर टीम इंडिया 8 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात करणार आहे. टीम इंडियाचा पहिलाच सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे.
आशिया कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
स्टँडबाय | संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर)