CWG 2022: मेडल जिंकण्यासाठी भारतीय बॉक्सर्सचा कसून सराव, आयर्लंड मध्ये प्रॅक्टिस
मागच्या काही वर्षात बॉक्सिंगच्या (Boxing) खेळात भारतात चांगली प्रगती झाली आहे. भारतीय बॉक्सर्सनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने पदकविजेती कामगिरी केली आहे.
मुंबई: मागच्या काही वर्षात बॉक्सिंगच्या (Boxing) खेळात भारतात चांगली प्रगती झाली आहे. भारतीय बॉक्सर्सनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने पदकविजेती कामगिरी केली आहे. यंदा कॉमनवेल्थ गेम्स मध्येही भारताला बॉक्सिंगकडून चांगल्या पदकांची अपेक्षा आहे. बर्मिंघम मध्ये कॉमनवेल्थ गेम्स (CWG) साठी गेलेल्या भारतीय बॉक्सिंग चमूत एकूण 12 भारतीय बॉक्सर्स आहेत. यात आठ पुरुष आणि चार महिला आहेत. या सर्व बॉक्सर्सनी पदक जिंकण्याचा चंग बांधला असून त्यांनी सराव सुरु केला आहे. अमित पानघल, आशिष कुमार चौधरी, संजीत मोहम्मद हसमुद्दीन यांनी शॅडो बॉक्सिंगची (Shadow Boxing) प्रॅक्टिस सुरु केली आहे. कोच धर्मेंद्र सिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सराव सुरु आहे.
मेडलसाठी भारतीय बॉक्सर्सचा जोरदार सराव
“बर्मिंघम मध्ये कॉमनवेल्थ गेम्ससाठी चांगली तयारी सुरु आहे. आठ बॉक्सर्स मेहनत घेत आहेत. कोविड 19 चे निर्बंध असूनही बीएफआय, साई आणि एनआयएस इथे कोचिंग कॅम्प आयोजित करण्यात आले होते. तिथला अनुभव खूपच सुंदर होता. प्रशासकीय दृष्टीकोनातून सगळ्याच व्यवस्थापन व्यवस्थित करण्यात आलं. उपकरणांची देखपाल, कोचिंग या सर्व सगळ्याचा त्या मध्ये समावेश होता” असं, भारतीय पुरुष बॉक्सिंग टीमचे कोच नरेंद्र राणा एएनआयशी बोलताना म्हणाले.
आयर्लंड मध्ये ट्रेनिंग
कॉमनवेल्थ स्पर्धा आता अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. उत्तर आयर्लंडची राजधानी बेलफास्ट येथे भारतीय बॉक्सर्स मागच्या दोन आठवड्यांपासून जोरदार सराव करत आहेत. “आमच्या बॉक्सर्सना आयर्लंड मध्ये ट्रेनिंग करायला मिळतेय, ही खरोखर चांगली बाब आहे. चांगल्या कामगिरीसाठी अशा वातावरणात ट्रेनिंग आव्हानात्मक आहे. मागचे 13 दिवस आम्ही आयर्लंड मध्ये ज्या पद्धतीचा सराव केलाय, त्याचा प्रत्यक्ष स्पर्धेच्यावेळी सकारात्मक परिणाम दिसेल, अशी अपेक्षा करुया” असं राणा म्हणाले.