CWG 2022: स्विंग क्वीन म्हणायचं की, विकेट घेणारी मशीन, भारताच्या ‘या’ गेम चेंजरचा VIDEO बघा
CWG 2022: क्रिकेट मध्ये एक चेंडूही सामन्याचं चित्र बदलण्यासाठी पुरेसा ठरतो. इथे, तर असे 4 चेंडू होते. सध्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये महिला क्रिकेटचाही समावेश करण्यात आला आहे.
मुंबई: क्रिकेट मध्ये एक चेंडूही सामन्याचं चित्र बदलण्यासाठी पुरेसा ठरतो. इथे, तर असे 4 चेंडू होते. सध्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये महिला क्रिकेटचाही समावेश करण्यात आला आहे. भारताकडून रेणुका सिंह ठाकूरने आपल्या वेगवान गोलंदाजीने धुमाकूळ घातला आहे. हिमाचल प्रदेश मधून येणाऱ्या रेणुकाने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना हैराण करुन सोडलं आहे. तिला स्विंग क्वीन म्हणायचं की, विकेट घेण्याची मशीन हा खरा प्रश्न आहे. आपल्या गोलंदाजीच्या बळावर ती अगदी सहजतेने प्रतिस्पर्धी संघाच्या विकेट काढतेय. बारबाडोस विरुद्ध सामन्यातही तिची गोलंदाजी चालली. तिने टाकलेल्या 4 चेंडूंनी भारताच्या विजयाची स्क्रिप्ट लिहिली. बारबाडोस विरुद्ध भारताने 100 धावांनी सामना जिंकला. या सोबतच भारतीय क्रिकेट संघ कॉमनवेल्थच्या सेमीफायनल मध्ये पोहोचला. भारतीय संघाच्या या यशात रेणुका सिंह ठाकूरचं योगदान मोठं आहे.
4 ओव्हर मध्ये 10 रन्स 4 विकेट
रेणुका सिंह ठाकूरने कॉमनवेल्थ गेम्सच्या पीचवर बारबाडोस विरुद्ध 4 ओव्हरमध्ये 10 धावा देऊन 4 विकेट काढल्या. टी 20 इंटरनॅशनल करीयर मधील तिचं हे सर्वोत्तम प्रदर्शन आहे. कॉमनवेल्थच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिने 4 विकेट काढल्या होत्या.
टॉप 4 फलंदाजांची विकेट काढली
बारबाडोस विरुद्ध रेणुका सिंह ठाकूरने टॉप 4 फलंदाजांना आऊट केलं. तिने डियांड्रा डॉटिन आणि आलिया अलिनला खातही उघडू दिलं नाही. त्याशिवाय हॅले मॅथ्यूजला 9 रन्सवर आणि किसिया नाइटला 3 धावांवर बाद केलं. या चारही महिला फलंदाजांचं टी 20 क्रिकेटच्या फॉर्मेट मध्ये मोठं नाव आहे. रेणुका सिंहच्या स्विंग होणाऱ्या चेंडूंसमोर या चारही फलंदाज हतबल दिसून आल्या.