CWG 2022: 32 अब्ज रुपयांच्या फाइटने एका भारतीय बॉक्सरच कसं आयुष्य बदललं, ते जाणून घ्या….
दिग्गज बॉक्सर फ्लॉयड मेवेदर (flayed meveder) आणि मॅनी पॅकियाओ यांच्यामध्ये 2015 साली बॉक्सिंगची (Boxing) एक मॅच झाली होती. या सामन्याला फाइट ऑफ द सेंच्युरी म्हटलं जातं.
मुंबई: दिग्गज बॉक्सर फ्लॉयड मेवेदर (flayed meveder) आणि मॅनी पॅकियाओ यांच्यामध्ये 2015 साली बॉक्सिंगची (Boxing) एक मॅच झाली होती. या सामन्याला फाइट ऑफ द सेंच्युरी म्हटलं जातं. जगभरातील बॉक्सिंग प्रेमीच्या नजरा त्या सामन्यावर होत्या. भारतातही फॅन्स मध्ये फाइट ऑफ द सेंच्युरी (Fight of the Century) बद्दल एक वेगळा उत्साह होता. फाइट ऑफ द सेंच्युरीची उलाढाल जवळपास 32 अब्ज रुपयांच्या घरात होती. या सामन्याने एका भारतीयाचं आयुष्य बदलून टाकलं. त्याचं नाव आहे, सागर अहलावत. आता हाच मुलगा कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारतीय बॉक्सिंग टीमचा हिस्सा आहे.
आयुष्यात ध्येय मिळालं
2015 साली पेपरात फाइट ऑफ द सेंच्युरीबद्दल एक लेख आला होता. तो वाचून आपण बॉक्सिंगच्या खेळाकडे वळलो, असं सागर सांगतो. 20 वर्षाचा सागर कॉमनवेल्थ गेम्स मध्ये 92 प्लस सुपर हेवीवेट गटात भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. सुरुवातीपासूनच मी अभ्यासात हुशार नव्हतो. म्हणूनच 12 वी नंतर वेगळ काहीतरी शोधायला सुरुवात केली. एका शेतकरी कुटुंबात सागरचा जन्म झालाय. शेतीशी संबंधित असलेल्या सागरची खेळांशी काही देणं-घेणं नव्हतं. पेपरात छापून आलेल्या मेवेदर आणि पॅकियाओच्या सामन्याबद्दल त्याने भरपूर वाचलं. ते वाचल्यानंतरच आपल्याला काय करायचं आहे, हे त्याला उमगलं. 2017 साली त्याने बॉक्सिंग सुरु केली.
डेब्यु मध्ये सिलव्हर मेडल
2019 साली सागर अहलावतने अखिल भारतीय विश्वविद्यालय खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकलं. खेलो इंडिया विश्वविद्यालय स्पर्धेत आपली क्षमता दाखवून दिली व किताब जिंकला. 2021 मध्ये सीनियर नॅशनल स्पर्धेत डेब्यू केला. पहिल्याच प्रयत्नात रौप्यपदक विजेती कामगिरी केली. त्यानंतर नॅशनल कॅम्प मध्ये त्याचा समावेश झाला. कॉमनवेल्थ गेम्सच्या निवडी मध्येही सागरने शानदार कामगिरी केली. त्यामुळेच त्याला बर्मिंघमचं तिकिट मिळालं. त्याने टोक्यो ऑलिम्पिकच्या क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलेल्या सतीश कुमारला हरवलं. त्यानंतर विद्यमान राष्ट्रीय चॅम्पियनला पराभवाचं पाणी पाजलं. सागरचीही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. पहिल्याच प्रयत्नात इतिहास रचण्याचा त्याचा प्रयत्न असेल.