CWG 2022: योग्य टेक्निक आणि स्ट्रॅटजीने बॉक्सर अमित पंघाल सेमीफायनलमध्ये, आणखी एक मेडल निश्चित
अमित पंघालने गुरुवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 51 किलो वजनीगटात सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आहे. क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये अमितने स्कॉटलंडच्या लेनिन मुलीगनवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला.
मुंबई: अमित पंघालने गुरुवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 51 किलो वजनीगटात सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आहे. क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये अमितने स्कॉटलंडच्या लेनिन मुलीगनवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. अमितने अंतिम 4 मध्ये प्रवेश करतानाच पदक निश्चित केलं आहे. अमितने मागच्यावेळी गोल्ड कोस्ट मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक विजेती कामगिरी केली होती. यावेळी सुवर्णपदक जिंकण्याचा त्याचा प्रयत्न असेल. अमितने सुरुवातीला संयम दाखवून प्रतिस्पर्ध्याची रणनिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. प्रतिस्पर्ध्याचा खेळ त्याला समजून घ्यायचा होता. त्यानंतर त्याने काही चांगले पंच मारले. हुकसह त्याने अचूक फटके लगावले. लेनिनने मारलेले पंचही त्याने चुकवले. पहिल्या राऊंडच्या शेवटी अमितने जॅबसाठी दोन अचूक ठोस लगावले. त्यानंतर लेफ्ट हुकच्या माध्यमातून गुण मिळवले.
दुसऱ्या राऊंड मध्ये जास्त आक्रमक
दुसऱ्याराऊंड मध्ये लेनिन सुरुवातीपासूनच आक्रमक होता. त्याने रिंग मध्ये दाखल होताच वेगवान पंचेस मारणं सुरु केलं. अमितने त्यावेळी बचावात्मक रणनिती स्वीकारली. लेनिन थोडा थकल्यासारखा वाटला. त्याचा फायदा अमितने उचलला. त्याने दोन सणसणीत जॅबचे फटके मारले. लेनिन पहिल्या राऊंडच्या तुलनेत दुसऱ्या राऊंड मध्ये जास्त चांगला खेळला. चार पंचांनी अमितच्या बाजूने निकाल दिला.
तिसरा राऊंड अनुभवाने जिंकला
तिसऱ्या राऊंड मध्येही लेनिनने आक्रमक सुरुवात केली. तो गडबडीत दिसला. अमितने अनुभवाच्या बळावर त्याचा चांगला सामना केला. तीन पंचच्या कॉम्बिनेशनने लेनिनला कमकुवत करुन टाकलं. अमितकडे आघाडी होती. म्हणून त्याने बचावात्मक खेळण्यावर भर दिला. रिंग मध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्याला फिरवत होता. त्याला त्याचा फायदा मिळाला व विजय मिळवण्यात तो यशस्वी ठरला.
‘या’ महिला बॉक्सर्सनीही पक्क केलं मेडल
निकहत जरीन (50 किलो वजनीगट), नीतू गंघास (48 किलो वजनीगट) आणि मोहम्मद हुसामुद्दीन (57 किलो वजनीगट) यांनी सेमीफायनल मध्ये पोहोचून आपल पदक निश्चित केलं आहे.