Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनच्या तारखेबद्दल अनेकांमध्ये संभ्रम, 30 की 31 कधी होणार साजरा?
Raksha Bandhan 2023 संरक्षणासाठी बांधलेला धागा म्हणजे रक्षासूत्र. असे मानले जाते की राजसूय यज्ञादरम्यान, द्रौपदीने तिच्या रेशमी कापडाचा एक तुकडा भगवान कृष्णाला रक्षासूत्र म्हणून बांधला होता. यानंतर बहिणींनी भावाला राखी बांधण्याची परंपरा सुरू झाली.
मुंबई : श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन (Raksha Bandhan 2023) साजरा केला जातो. रक्षाबंधन हा महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे, जो भारतातील अनेक भागात साजरा केला जातो. भारताशिवाय जगात जिथेही हिंदू धर्माचे लोकं राहतात तिथे बहिण भाऊ हा सण साजरा करातात. राखी हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात. यावेळी 30 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट या दोन्ही दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. यासोबतच रक्षाबंधनाला पौर्णिमेचा योगायोग असणार आहे, जो खूप खास मानला जातो. जाणून घेऊया रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त, भाद्रचा काळ आणि शुभ योगायोग.
रक्षाबंधन शुभ मुहूर्त
शास्त्रानुसार भद्राकाळात रक्षाबंधन साजरे करू नये, असे करणे अशुभ मानले जाते. 30 ऑगस्टला रात्री 9.02 वाजतापर्यंत भद्राकाळ असेल. त्यानंतर रक्षाबंधन साजरे केले जावू शकते. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7.5 मिनिटांपर्यंत राखी बांधता येईल.
श्रावण पौर्णिमा तिथीची सुरुवात – 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10.59 वा पौर्णिमा तिथी समाप्त – 31 ऑगस्ट सकाळी 7:05 वाजता
रक्षाबंधन पूजन पद्धत
रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, आंघोळ करावी. स्वच्छ कपडे घालावे आणि सूर्यदेवाला जल अर्पण करावे. त्यानंतर घराच्या मंदिरात किंवा जवळच्या मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घ्यावे. देवाची पूजा केल्यानंतर राखीचे ताट करावे. ताटात कलश, नारळ, सुपारी, कलव, रोळी, चंदन, अक्षत, दही, राखी आणि मिठाई ठेवा. ताटात तुपाचा दिवाही ठेवावा. प्रथम देवाला औक्षवण करा. पहिली राखी देवाला अर्पण करा. देवाला राखी अर्पण करून वर सांगितलेली शुभ मुहूर्त पाहून आपल्या भावाला पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसवावे. यानंतर भावाला टिळा लावावा, नंतर राखी म्हणजेच रक्षासूत्र बांधा आणि त्यानंतर त्याला ओवाळा. भावाचे तोंड गोड करा. रक्षासूत्र बांधल्यानंतर आई-वडील किंवा घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या.
रक्षाबंधनाचे पौराणिक महत्त्व
संरक्षणासाठी बांधलेला धागा म्हणजे रक्षासूत्र. असे मानले जाते की राजसूय यज्ञादरम्यान, द्रौपदीने तिच्या रेशमी कापडाचा एक तुकडा भगवान कृष्णाला रक्षासूत्र म्हणून बांधला होता. यानंतर बहिणींनी भावाला राखी बांधण्याची परंपरा सुरू झाली. तसेच, पूर्वीच्या काळी ब्राह्मण यजमानांना राखी बांधत असत आणि त्यांना शुभेच्छा देत असत. या दिवशी वेदपाठी ब्राह्मण यजुर्वेदाचे पठण सुरू करतात. म्हणूनच रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच श्रावण शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी शिक्षण सुरू करणे शुभ मानले जाते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)