Trimbakeshwar | श्रावणात त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी
Nashik Trimbakeshwar Temple | नाशिक त्र्यंबकेश्वर मंदिर किती वाजेपर्यंत दर्शनासाठी खुलं राहणार?. त्र्यंबकेश्वर येथे विविध धार्मिक विधी होत असल्याने देश-विदेशातून भाविक येथे येत असतात.
नाशिका : नाशिक येथील त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर भक्तगणांमध्ये प्रसिद्ध आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात इथे ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. खासकरुन श्रावणी सोमवारी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने भाविक येथे येतात. त्र्यंबकेश्वर येथे विविध धार्मिक विधी होत असल्याने देश-विदेशातून भाविक येथे येत असतात. नेहमीच इथे गर्दी असते. आता श्रावणात त्रंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महत्वाची बातमी आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
श्रावणात पहाटे 5 वाजल्यापासून पासून रात्री 9 वाजेपर्यंत दर्शनासाठी मंदिर खुलं राहणार आहे. प्रत्येक श्रावणी सोमवारी पहाटे 4 वाजता मंदिर खुलं होणार आहे.
गावकऱ्यांना कधी दर्शन घेता येणार?
गावकऱ्यांच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गावकऱ्यांना मंदिर उघडल्यानंतर सकाळी 10:30 पर्यंत तर संध्याकाळी 6 ते 8 पर्यंत दर्शन घेता येणार आहे. गावकऱ्यांना दर्शनाकरिता येताना, रहिवासी पुरावा सोबत असणं बंधनकारक आहे. भक्तगणांसाठी काय व्यवस्था केलीय?
गावकऱ्यांना उत्तर महाद्वारातून प्रवेश मिळणार आहे. भाविकांना दर्शन रांगेत त्रास होऊ नये याकरिता वातानुकूलित दर्शन बारीची व्यवस्था करण्यात आली आहे. जेष्ठ नागरिकांना बसण्याची व्यवस्था तर स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवशंकरावर श्रद्धा असणारे कोट्यवधी भाविक दरवर्षी जगाच्या कानाकोपऱ्यातून ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात येत असतात. महादेवाच्या दर्शनानंतर मनोकामना पूर्ण होते, अशी इथे येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे.