हमारे साहेब पहचान है हमारी, काल अजित पवारांसोबतचा Video, आज रत्नागिरीतले बॅनर्स चर्चेत
शुक्रवारी राजकीय वर्तुळात हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत होता. त्यानंतर आता त्यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स चर्चेत आहेत.
रत्नागिरीः कोकणातलं बडं प्रस्थ, शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या एका फोटोची काल विधिमंडळ परिसरात जोरदार चर्चा झाली. खुद्द विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांना बोलावून फोटो काढला. पवार-सामंतांचा हा फोटो सोशल मीडियात काल दिवसभर चर्चेचा विषय होता. तर आज उदय सामंत यांच्या मतदारसंघात आणखी काही बॅनर्स (Banners) लक्ष वेधून घेत आहेत. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत भव्य बॅनरबाजी केली आहे.
उद्या 26 डिसेंबर रोजी उदय सामंत यांचा वाढदिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी सामंत यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत.
एक हस्ती जो जान है हमारी, हमारे साहेब पहचान है हमारी असा मजकूर या बॅनरवर आहे. शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी बॅनर्स झळकवण्यात आले आहेत. माळनाका परिसरात हे बॅनर्स लागले आहेत.
उदय सामंत हे रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रीपद होतं. तर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे उद्योग मंत्री पद आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना असा प्रवास झालेले उदय सामंत सध्या एकनाथ शिंदे गटात आहेत. म्हाडाचं अध्यक्षपद, शिवसेना उपनेते, कॅबिनेट मंत्री, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री अशा जबाबदाऱ्या त्यांनी पेलल्या आहेत.
कालचा व्हिडिओ चर्चेत
विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरु आहे. यानिमित्त सर्व मंत्री आमदार नागपुरात आहेत. काल विधानभवन परिसरात सकाळच्या वेळी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मंत्री उदय सामंत यांना बोलावलं. त्यांच्यासोबत फोटो घेतले. हा फोटो पाहून एकनाथराव… असं वक्तव्य झालं आणि हशाही पिकला. शुक्रवारी राजकीय वर्तुळात हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत होता. त्यानंतर आता त्यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स चर्चेत आहेत.