Eknath Shinde: एकनाथ शिंदेमुळे ठाकरे सरकारचं अस्तित्व धोक्यात? शिंदे बंडावर ठाम राहिले तर सरकार कोसळणार? या स्टोरीचे 4 अँगल लक्षात ठेवा
Eknath Shinde: एकनाथ शिंदे हे काल संध्याकाळपासून नॉट रिचेबल आहेत. ते सुरतच्या ला मेरेडियन हॉटेलात असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदेंसोबत 13 आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे यांनी बंड केल्यास त्यांच्यासोबत हे 13 आमदार राहतील.
मुंबई: शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) कालपासून नॉट रिचेबल आहेत. विधान परिषदेचा निकाल (vidhan parishad election) लागल्यापासून त्यांचा फोन लागत नाहीये. विशेष म्हणजे विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन उमेदवार विजयी झाले. पण शिवसेनेची (shivsena) मते फुटली आहेत. त्यामुळे खळबळ उडालेली असतानाच आता शिंदे नॉट रिचेबल असल्याने शिवसेनेत भूकंप आला आहे. शिंदे यांनी थेट ठाकरे सरकार विरोधात बंड केल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे सुरतमध्ये तळ ठोकून आहेत. त्यांच्यासोबत 13 आमदार आहेत. शिंदे हे दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी जर शिंदे आपल्या बंडावर ठाम राहिल्यास ठाकरे सरकार कोसळणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे बंडावर ठाम राहिल्यास त्यांच्यासोबत केवळ 13च नव्हे तर 30-32 आमदार फुटणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
सरकार अल्पमतात येणार
एकनाथ शिंदे हे काल संध्याकाळपासून नॉट रिचेबल आहेत. ते सुरतच्या ला मेरेडियन हॉटेलात असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदेंसोबत 13 आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे यांनी बंड केल्यास त्यांच्यासोबत हे 13 आमदार राहतील. त्यामुळे सरकार अल्पमतात येणार आहे. विधान परिषद निवडणुकीत आघाडीची 22 मते फुटली होती. त्यात शिवसेना आमदारांची तीन मते आणि इतर पक्ष व अपक्षांची मतेही होती. म्हणजे शिंदे यांनी बंड केल्यास विधान परिषदेत फुटलेले 22 आमदार आणि शिंदेंसोबत असलेले 13 आमदार असे एकूण 33 आमदार आघाडीतून बाहेर पडणार असल्याचं सांगितलं जात आहे. परिणामी ठाकरे सरकार अल्पमतात येणार असल्याचं सांगितलं जातं.
शिवसेनेचं संख्याबळ घटणार
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यास त्यांच्यासोबतचे 13 आमदारही आघाडीतून बाहेर पडतील. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 44 होणार आहे. परिणामी ठाकरे सरकार अल्पमतात येईल. आघाडी सरकार अल्पमतात आल्यास उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याचं सांगितलं जात आहे.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर संकट
शिवसेनेत अनेक बंड झाली. अनेक नेते सोडून गेले. शिवसेना सत्तेत असताना कधीही बंड झालं नव्हतं. एकही नेता शिवसेनेला सोडून गेला नव्हता. मात्र, राज्यात पक्षाचा प्रमुखच मुख्यमंत्री असताना शिवसेनेत पहिल्यांदाच बंड झालं आहे.
काँग्रेस आधीच नाराज
सरकार स्थापन झाल्यापासून काँग्रेस आधीच आघाडी सरकारवर नाराज आहे. सत्तेत आपल्याला दुय्यम वागणूक मिळत असल्याची काँग्रेसची तक्रार होती. केवळ राष्ट्रवादी आणि शिवसेनाच हे सरकार चालवत असल्याचं चित्रं होतं. तसेच निधी वाटपातही दुय्यम स्थान मिळत असल्याने काँग्रेसची नाराजी होती. काल तर आमदार फुटल्याने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे प्रचंड नाराज झाले होते. अडीच वर्ष झाले आहेत. आता विचार करावा लागेल, असं सूचक विधान थोरात यांनी केलं होतं.