राहुल गांधी यांनी मांडलेलं सत्य मान्य नसेल तर भाजपने…; सामनातून भाजपवर निशाणा
Saamana Editoriol on PM Narendra Modi : नरेंद्र मोदींसारखा 'सुपरमॅन' चीनने भारताच्या बाबतीत वाकडी पावलं टाकतो कशी?; सामनातून टीकास्त्र. राहुल गांधी यांच्या लडाख दौऱ्यावरही भाष्य. पाहा सामनात नेमकं काय?
मुंबई | 23 ऑगस्ट 2023 : काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या लडाखमध्ये आहेत. त्याचाच धागा धरत आजच्या सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.चीनच्या घुसखोरीवरही भाष्य करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांनी दिलेले पुरावे जर भाजपला मान्य नसतील तर त्यांनी पुरावे मांडावेत. सत्य काय ते देशासमोर आणावं, असं सामनात म्हणण्यात आलं आहे. तसंच पंतप्रधान मोदी यांना सुपरमॅन म्हणत सामनातून भाजपवर टीका करण्यात आली आहे.
सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा
चीनचे लष्करी सामर्थ्य हिंदुस्थानच्या तुलनेत प्रचंड आहे. पंतप्रधान मोदी यांनी चिनी राष्ट्राध्यक्षांना अहमदाबादेत आणून कितीही ‘झोके’ दिलेतरी ‘भाईभाई’ किंवा ‘मैत्री’ अशा भाकड कथांवर चीन विश्वास ठेवत नाही . चीनने लडाखमध्ये घुसखोरी केलीच आहे व अनेकदा चीनच्या नकाशात अरुणाचल प्रदेश दाखवून आपल्याला डिवचले जाते .
मोदींसारखा ‘ सुपरमॅन ‘ पंतप्रधान आपल्याला लाभला असताना चीनने हिंदुस्थानच्या बाबतीत अशी वाकडी पावले टाकावीत हे मोदी भक्तांना मान्य होणार नाही . लडाखच्या भूमीवर राहुल गांधी आहेत . त्यांनी चिनी घुसखोरीचे सत्य मांडले . भाजपास ते मान्य नसेल तर नेमके सत्य काय ते त्यांनी पुराव्यासह मांडावे!
श्री. राहुल गांधी सध्या लेह आणि लडाखच्या दौऱ्यावर आहेत व तेथील जनतेने राहुल गांधी यांच्या दौऱ्यास उदंड प्रतिसाद दिला आहे. लडाखच्या सीमेवरून चीन सतत धडका मारीत आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत चीनने आपल्या हद्दीत घुसखोरी करून जमीन बळकावली आहे. अनेक ठिकाणी चिनी व हिंदुस्थानी सैनिकांत संघर्ष झाला, पण पंतप्रधान मोदी हे सत्य स्वीकारायला तयार नाहीत. लडाखची इंचभरही जमीन गमावलेली नाही असा दावा पंतप्रधान मोदी करतात, पण मोदी सपशेल खोटे बोलत आहेत व चीनने आपल्या भूभागावर अतिक्रमण केले असल्याचे सत्य राहुल गांधी यांनी मांडले आहे.
चीनने हिंदुस्थानी हद्दीत घुसखोरी केलीच आहे. गायरान जमिनी चीनने ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे इंचभरही जमीन गमावली नाही हा पंतप्रधान मोदींचा दावा खोटा असल्याचे राहुल गांधी यांनी लडाखच्या भूमीवरून स्पष्ट केले आहे. राहुल गांधी यांनी राष्ट्रीय सुरक्षेबाबत सत्य मांडल्याने भारतीय जनता पक्षाने टीका सुरू केली व पुन्हा एकदा मोदी भक्त भूतकाळातले खड्डे नव्याने उकरू लागले. भाजपच्या मते राहुल गांधी हे देशाचा अपमान करीत आहेत.
चीनने घुसखोरी केली काय? असा प्रश्न विचारल्याने देशाचा कोणता व कसा अपमान झाला? हे भाजप प्रवक्त्यांना सांगता येईल काय? राहुल गांधी स्वतः मोटरसायकल चालवीत लेहवरून लडाखला गेले. हा रस्ता दुर्गम व धोक्याचा आहे. राहुल गांधींचे हे साहस एखाद्या वीर जवानाप्रमाणे आहे. तेथून ते पेन्गाँगला पोहोचले व नुबरा, कारगील येथेही गेले. हे सर्व करण्यामागे राहुल गांधी यांची देशभक्तीच आहे. देशभक्तीचा मक्ता भाजपनेच घेतलेला नाही.