Raj Thackeray Panvel : चांद्रयान 3 चंद्रावर पाठवण्यापेक्षा महाराष्ट्रात पाठवा; भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी सरकारचं लक्ष वेधलं
Raj Thackeray News : पुण्यात मराठी माणसांची कोंडी होतीये. एकाच पुण्यात 5 शहरं झाली आहेत, असं म्हणत राज ठाकरे यांनी पुणे शहरातील वाढत्या गर्दीवर भाष्य केलंय. रस्त्यातील खड्ड्यांवरून राज ठाकरे यांचा सरकारवर निशाणा; म्हणाले...
पनवेल | 16 ऑगस्ट 2023 : जमलेल्या माझ्या मराठी बांधवांनो-भगिनींनो आणि मातांनो…, असं म्हणत राज ठाकरे यांनी पनवेलमधील भाषणाला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी राज्यातील रस्त्यांच्या खड्ड्यांवर लक्ष वेधलं. चांद्रयान 3 हे चंद्रावर पाठवलंय. त्याचा आपल्याला काय उपयोग आहे. चंद्रावर जाऊन ते यान खड्डेच बघणार आहे. त्यापेक्षा ते महाराष्ट्रात पाठवलं असतं. तर खर्च वाचला असता, असं म्हणत राज ठाकरे यांनी रस्त्यातील खड्ड्यांवर टिपण्णी केली आहे. तसंच त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका तर भाजपला त्यांनी एक सल्लाही दिलाय.
पनवेल शहरात आज राज ठाकरे यांच्या निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात निर्धार मेळावा पार पडत आहे. गेले 17 वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्ग आणि राज्यातील रस्त्यांची अवस्था या विषयांवर राज ठाकरे सध्या बोलत आहेत. मनसैनिकांसह स्थानिक नागरिक या मेळाव्याला उपस्थित आहेत. या मेळाव्यात राज ठाकरे संबोधित करत आहेत.
महाराष्ट्रातील अनेक रस्त्यांची अवस्था बिकट आहे. लोकांचं मला कौतुक वाटतं. या रस्त्यांवरच्या खड्ड्यांमधून सर्वच लोक जात असताना त्याच त्याच पक्षातील लोकांना हे कसे काय निवडून देतात? आम्ही खड्ड्यातून गेलो काय अन् खड्ड्यात गेलो काय… त्याच लोकांना आम्ही निवडून देतो.तुम्हा लोकांना असं वाटत नाही का की या लोकांना धडा शिकवला पाहिजे?, असं राज ठाकरे म्हणाले.
भाजपने इतर पक्षांचे आमदार न फोडता स्वतःचा पक्ष उभारायला शिकावं. दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा स्वतःचा पक्ष उभारायला भाजपनं शिकावं. लोकांच्या डोक्यावर बंदुका ठेवायच्या अन् त्यांना पक्षात घ्यायचं. त्यापेक्षा स्वत:चा पक्ष उभा करा, असं राज ठाकरे म्हणाले.
बाहेरून आलेली ती लोकं गाडीत झोपून जाणार आणि मग म्हणणार मी होतो का त्या गाडीत…, म्हणायचं. निर्लज्जपणाचा कळस सध्या महाराष्ट्रात सुरु आहे. आपण या सरकारमध्ये का आलात तर म्हणाले महाराष्ट्राचा विकास करायचाय मला…., अरे कशाला खोटं बोलताय. नरेंद्र मोदी यांनी 70 हजार कोटींच्या आरोप केले की टुणकन सगळे इकडे आले, असं म्हणत राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
लोकांना नक्की काय हवंय? असंच राहायचं असेल. लोकांचे प्रश्न भिजत ठेवायचे असतील तर तुमचं तुम्हाला लखलाभ पण तुम्हाला बदल हवा असेल तर माझ्या हातात सत्ता द्या. मग बघा…, असं राज ठाकरे म्हणालेत.