भाजपसाठी दरवाजे उघडे आहेत, पण… प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
मणिपूरमधील हिंसाचारावरही त्यांनी भाष्य केलं. मणिपूरमधील कुकी समाजावर केंद्र सरकारने अन्याय केला आहे. मणिपूरमध्ये विधानसभेच्या 90 जागा आहेत आणि त्यात 40 जागा आदिवासी समाजासाठी राखीव आहेत.
मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : फ्रेंडशिप डे म्हणून फेसबुकवर मी एक पोस्ट केली होती. माझे दरवाजे सगळ्यांसाठीच मोकळे आहेत. ज्यांना ज्यांना मैत्री करायची आहे त्यांच्यासाठी माझे दरवाजे मोकळे आहेत. राजकीय मैत्री असू किंवा वैयक्तिक मैत्री. भाजप नेते घरी चहा प्यायला आले तर त्यांच्यासाठीही दरवाजे उघडे आहेत. पण राजकीय नाही, असं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिम समाजाला महत्त्वाच्या सूचना करतानाच मोठं आवाहनही केलं आहे. वेळ बदलत चालली आहे. 2024 ला हे सरकार बदलून नवीन सरकार येणार असं भासवल जात आहे. पण येत्या काळात राजकारणात खूप बदल पाहायला मिळणार आहेत. 2024 नंतर पंतप्रधान मोदी नसणार हे जर सत्यात आणायचं असेल तर मुस्लिम लोकांनी बारकाईने राजकारण समजून घ्याव लागेल, असं मतही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं.
तुम्ही लढलं पाहिजे
मुस्लिमांची देशभरात 15% लोकसंख्या आहे. त्यामुळे तुम्ही कोणालाही बनवू शकता आणि बिघडवू शकता. मुस्लिमांनी आपली भीती सोडून द्यावी. दंगली होतील आणि जातीलही. दंगली काय फक्त मुस्लिम समाजातील लोकांसोबतच होत नाही. आदिवासी, दलित, शोषित आणि पीडित हे सगळे लढत आहेत. त्यामुळे मुस्लिम समाजातील लोकांनी सुद्धा लढलं पाहिजे, असं आवाहन आंबेडकर यांनी केलं
तर मोदी पंतप्रधान होणार नाहीत
दंगली झाल्या नाही तर मोदी हे पंतप्रधान होणार नाही. मी जिथून निवडणूक लढतो तिथे देखील दंगली घडवून आणण्याच काम केल गेलं. पण आम्ही आमच्या जनतेला समजावलं, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी ज्ञानव्यापीच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. ज्ञानव्यापी हा मुद्दा आताचा नाही. ब्रिटिशांच्या आधीपासूनचा हा मुद्दा आहे, असं स्पष्ट केलं.
मणिपूरमध्ये मदत करा
मणिपूरमधील हिंसाचारावरही त्यांनी भाष्य केलं. मणिपूरमधील कुकी समाजावर केंद्र सरकारने अन्याय केला आहे. मणिपूरमध्ये विधानसभेच्या 90 जागा आहेत आणि त्यात 40 जागा आदिवासी समाजासाठी राखीव आहेत. कुकी समाजाने आता तिथे एक नवीन संघटना बांधली आहे. त्यामुळे तेथील मुस्लिम समाजाने त्यांना मदत केली पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं.
वाद कुणाला हवाय?
औरंगजेबाच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. कोणाला वाद हवा आहे? मी औरंगजेबाच्या मजारीवर गेल्यानंतर शांतता निर्माण झाली, हे तुम्ही पाहिलं असेल, असंही ते म्हणाले.