भांडुपला गाडी पाठवा, यांच्या जिभेची नसबंदी करा, यांच्या बोलण्याला पाय-डोकं नाही, संजय राऊतांवर कुणी केलीय टीका?
संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर भाजपचा पोपट अशा शब्दात टीका केली होती. त्यानंतर मनेसतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर अत्यंत जहरी टीका करण्यात आली आहे. बीएमसीनं एक गाडी भांडूपला पाठवावी. यांच्या जिभेची नसबंदी करून द्यावी. कारण त्यांच्या बोलण्याला पाय असतात ना डोकं.. असं वक्तव्य केलंय मनसे नेते संदीप देशपांडे यांनी. संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर भाजपचा पोपट अशा शब्दात टीका केली होती. त्यानंतर संदीप देशपांडे आक्रमक झाले आहेत. मनोरुग्णांवर मी फार बोलणार नाही, पण बीएमसीला त्यांची गाडी भांडूपला नेण्याची विनंती करणार असल्याचं देशपांडे यांनी आधीही सांगितलं होतं. आता त्याच वक्तव्याचा त्यांनी पुनरुच्चार केलाय.
काय म्हणाले संदीप देशपांडे?
भुंकणारे भुंकत राहतात. ऐकणारे ऐकत राहतात. मी तर परवा सांगितलंय, भांडुपला एक गाडी पाठवा. यांच्या जिभेची नसबंदी करून द्या… मनोरुग्णांवर काय बोलायचं, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केलाय.
विनायक राऊतांवरही टोकदार टीका
दरम्यान, शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावरही संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले,’ हे गल्लीतले नेते आहेत. चुकून गेलेले गल्लीतले नेते आहेत. त्यांची लायकी आता निवडणूकीमध्ये कळेल. मोदी यांचे फोटो लावून त्यांनी मत मिळवली आहेत. कोण कोणाची सभा बघत आहेत हे सगळ्यांना माहित आहे..
लोकं आता उद्धव ठाकरे यांच्या सभेला कंटाळले आहेत. त्यांना लोकांनाही रडताना पहायला आवडतं, अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे.
वरळीतून देशपांडेंची वर्णी?
आदित्य ठाकरे आमदार असलेल्या वरळी विधानसभा मतदार संघातून मनसे नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी मिळू शकते, अशी चर्चा आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून संदीप देशपांडे यांच्या वरळीतील फेऱ्या वाढल्या आहेत. वरळीतीली बीडीडी चाळीत आणखी एक महत्त्वाची बैठक होणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘ मुंबईत कोकणवासियांची लवकरच मनसेतर्फे एक बैठक होणार आहे. उद्या म्हाडा येथील बिडीडी चाळीतील बैठक आहे. तर सिडकोचीदेखील बैठक आयोजित करण्यात आल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलं.
वरळी हा मतदारसंघ कुणाच्या बापाचा नाही. त्यामुळे कुणी कुठून लढावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असा इशाराही संदीप देशपांडे यांनी यावेळी दिला.