शाहू महाराजांना लोकसभेचं तिकीट देणार का?; शरद पवार म्हणाले, त्यांनी मला निरोप दिलाय…
Sharad Pawar on Shahu Maharaj Loksabha Election : 2024 ची लोकसभा निवडणूक, शाहू महाराज यांची उमेदवारी अन् 'तो' निरोप; शरद पवार यांची सविस्तर प्रतिक्रिया. म्हणाले... त्यांनी मला त्यांची भूमिका सांगितली आहे. पाहा काय म्हणाले?
कोल्हापूर | 26 ऑगस्ट 2023 : 2024 ची लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात कोणत्या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. अशातच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाविषयी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. शाहू महाराज यांना जर उमेदवारी तर ते सर्वमान्य उमेदवार असतील, अशी चर्चा सध्या कोल्हापुरात आहे. त्यावर तुमचं मत काय? त्यांना उमेदवारी देण्याचा तुमचा विचार आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा दुसऱ्या कुणाबद्दल बोलणं योग्य नाही. पण उद्या जाऊन लोकांच्या इच्छेचा सन्मान करण्याची भूमिका शाहू महाराजांनी घेतली तर आम्हाला आनंदच होईल, असं शरद पवार म्हणाले. लोकसभा निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाहीये, असं शाहू महाराज यांनी माझ्या कानावर घातलं, असं शरद पवार म्हणाले.
शाहू महाराज यांनी अध्यक्षपद स्वीकारलं, हा माझ्यासाठी आनंदाचा धक्का होता. जयंत पाटील आणि ते काय बोलले. त्यानंतर शाहू महाराज सविस्तर बोलले आहेत. पक्षांतर बंदीवर त्यांनी स्वच्छ मत व्यक्त केलं. त्यांनी पक्षांना दिशा दाखवली. सार्वजनिक जीवनात राजकीय भूमिका त्यांनी आतापर्यंत कधी घेतली नाही. लोकांचा यथेच्छ सन्मान करण्याची भूमिका शाहू महाराज यांनी घेतली. तर आम्हीही योग्य भूमिका घेऊ, असंही शरद पवार म्हणालेत.
कोल्हापुरात कधी अशी स्थिती कधी पहिली नव्हती. प्रचंड सभेला गर्दी झाली. लोकांची गर्दी पाहता आम्ही जी मांडतोय ती भूमिका योग्य असा निष्कर्ष यातून निघतो. नवीन लोकांना संधी द्यावी, अशी सगळ्यांची भूमिका आहे. त्या दिशेने आम्ही जात आहोत, असं शरद पवार म्हणाले.
राज्यात बदलाचा ट्रेंड दिसतोय. भाजप आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या घटकांच्या संबंधी तरुण आणि वृद्ध नाराज असल्याचं चित्र आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला आपली भूमिका घेण्याचा अधिकार आहे. राष्ट्रवादी पक्षाचा मी अध्यक्ष आहे. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. पक्षाची अधिकृत भूमिका मांडण्याचा अधिकार आम्हाला आहे, असं म्हणत शरद पवार यांनी राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य केलंय.
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवरही शरद पवार बोलते झाले. राहुल गांधींच्या पहिल्या भारत दौऱ्यामुळे विरोधकांची स्थिती सुधारली आहे. दुसऱ्या दौऱ्याने सुद्धा स्थिती सुधारेल, असं म्हणत देशात आणि राज्यात सध्या बदलाचं वारं वाहत असल्याचं शरद पवार यांनी अधोरेखित केलं आहे.