कर्नाटक निवडणूक : राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून अजित पवार यांना वगळले ? हे आहे मोठे कारण
अजित पवार भाजपमध्ये जाणार अशा आशयाच्या चर्चा मागील काही दिवस सुरु आहेत. मात्र, अजित पवार यांनी हे वृत्त खोडून काढतानाच मरेपर्यंत आपण पक्षातच राहणार असल्याचे सांगितले आहे.
मुंबई : लोकसभेची निवडणूक अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीला मिनी लोकसभा निवडणूक मानण्यात येत आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तर, भाजप आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे गट, काँग्रेसही पुढे सरसावले आहेत. कर्नाटक निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्वाची ठरणार आहे. यासाठी पक्ष तयारीला लागला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 उमेदवारांची यादी पक्षाने प्रसिद्ध केली आहे. यासोबतच पक्षाने स्टार प्रचारकांची यादीही प्रसिद्ध केली असून यामधून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना वगळण्यात आले आहे. मात्र, यामागील कारण समोर आले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय मान्यता काढून घेतली आहे. त्यामुळे हा पक्ष आता राज्य पक्ष झाला आहे. अशावेळी कनार्टक येथील विधानसभा लढवून काही जागा जिंकून आल्यास पुन्हा राष्ट्रीय पक्ष होण्याच्या दृष्टीने वाटचाल करता येईल यासाठी ही निवडणूक राष्ट्रवादीसाठी महत्वाची आहे. यासाठी पक्षाने स्टार प्रचारकांसह पहिल्या नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
भाजपने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील केंद्रीय नेते नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नावे जाहीर केली आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे नाव वगळले आहे.
मरेपर्यंत आपण पक्षातच राहणार
अजित पवार भाजपमध्ये जाणार अशा आशयाच्या चर्चा मागील काही दिवस सुरु आहेत. मात्र, अजित पवार यांनी हे वृत्त खोडून काढतानाच मरेपर्यंत आपण पक्षातच राहणार असल्याचे सांगितले आहे. मुंबई येथे झालेल्या पक्ष कार्यकर्त्याच्या मेळाव्यालाही अजित पवार उपस्थित नव्हते. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत.
आपण राज्याचे नेते आहोत
राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेताना पक्षाचे राष्ट्रीय नेते निर्णय घेतात. मी राज्याच्या राजकारणात बरा आहे. आपण राज्याचे नेते आहोत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात लक्ष घालतो असे सांगत अजित पवार यांनी आपली मर्यादा याआधीच अधोरेखित केली आहे. त्यामुळेच त्यांचे नाव कर्नाटक विधानसभेच्या स्टार प्रचारकांच्या यादीत नसल्याचे मानले जात आहे.
हे आहेत राष्ट्रवादीचे उमेदवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्नाटक विधानसभा निवडणूक निरीक्षक शिवाजीराव गर्जे यांनी पक्षाच्या नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
उत्तम रावसाहेब पाटील ( निपाणी )
मन्सूर साहेब बिलागी ( देवर हिप्परगी )
जमीर अहमद इनामदार ( बसवन बागेवाडी )
कुलप्पा चव्हाण ( नागठाण – Sc )
हरी आर. ( येलबुर्गा )
माजी मंत्री आर.शंकर ( राणेबेन्नूर )
सुगुणा के. ( हगरी बोम्मनहल्ली – Sc )
एस.वाय.एम.मसूद फौजदार ( विराजपेठ )
श्रीमती रेहाना बानो ( नरसिंहराजा )
हे आहेत स्टार प्रचारक
शरद पवार – राष्ट्रीय अध्यक्ष
प्रफुल्ल पटेल – राष्ट्रीय उपाध्यक्ष
पी पी मोहम्मद फैजल – राष्ट्रीय सरचिटणीस
खासदार सुप्रिया सुळे
खासदार डॉ. (श्रीमती) फौजिया खान – राष्ट्रीय अध्यक्ष NMC
धीरज शर्मा – अध्यक्ष, NYC
सुश्री सोनिया डूहान – अध्यक्ष, NSC
सिराज मेहदी – अध्यक्ष, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग
शिवाजीराव गर्जे – जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र
आर हरी – अध्यक्ष, कर्नाटक राष्ट्रवादी काँग्रेस
प्रदीप कुमार – उपाध्यक्ष, कर्नाटक राष्ट्रवादी
उमा महेश्वर रेड्डी – जनरल सेक्रेटरी, कर्नाटक राष्ट्रवादी
रामभाऊ जाधव – जनरल सेक्रेटरी, कर्नाटक राष्ट्रवादी
ब्रिजमोहन श्रीवास्तव – राष्ट्रीय सचिव आणि प्रवक्ते
क्लाईड क्रॅस्टो – राष्ट्रीय प्रवक्ते