Hazrat Khwaja Garib Navaj Dargah : ज्ञानवापी, शाही ईदगाहनंतर आता अजमेर शरीफवर दावा; महाराणा प्रताप सेना म्हणाली- दर्ग्यात स्वस्तिक का?
या वादावर कायदेशीर मार्गाने तोडगा काढण्यासाठी कोणाला दर्ग्यात यायचे असेल तर अंजुमन समिती त्याचे स्वागत करेल, असेही समितीने म्हटले आहे.
नवी दिल्ली : देशात सध्या ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid), शाही ईदगाह आणि कुतूबमिनार मधील मशिदीवरून वाद सुरू आहे. तर यावरून भाजप आणि हिंदुत्वसंघटना राजकारण करत असल्याचा आरोप मुस्लिम संघटनांनी केला आहे. तर बाबरीनंतर आता ज्ञानवापी आणि ईदगाह ही घेतला जाईल असं सांगत एएमआयएम नेते आणि खासदार असादुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे. त्यातच आता नवीन वादाचा उदय झाला असून राजस्थानमधील अजमेर येथील हजरत ख्वाजा गरीब नवाज दर्गा ही मंदिर (Shiv Mandir) असल्याचा दावा केला जात आहे. हा दावा महाराणा प्रताप सेनेने केला आहे. संघटनेने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि केंद्र सरकारला पत्र लिहून याची चौकशी करण्याची विनंती केली आहे. तसेच महाराणा प्रताप सेनेच्या अधिकाऱ्यांनी एक चित्र पाठवत दर्ग्याच्या (Hazrat Khwaja Garib Dargah) खिडक्यांवर स्वस्तिकाच्या खुणा का असं म्हटलं आहे.
राजस्थानमधील महाराणा प्रताप सेनेच्या अधिकाऱ्यांनी अजमेर येथील हजरत ख्वाजा गरीब दर्गा ही मंदिर असल्याचा दावा केल्याने देशात खळबळ उडाली आहे. तसेच महाराणा प्रताप सेनेच्या अधिकाऱ्यांनी अजमेर दर्ग्याच्या खिडक्यांवर स्वस्तिकाच्या खुणा असणारा एक फोटो पाठवला आहे. तसेच त्यांनी सरकार आणि केंद्राला यात लक्ष घालावे तसेच याची चौकशी करण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर अजमेर येथील हजरत ख्वाजा गरीब नवाज दर्गा हे शिवमंदिर असून त्याचे दर्ग्यात रूपांतर करण्यात आल्याचा दावा महाराणा प्रताप सेनेचे संस्थापक राजवर्धन सिंह परमार करत आहेत.
आंदोलनाची धमकी दिली
राजवर्धन सिंह परमार यांचा दावा आहे की, दर्ग्यात स्वस्तिकाचे काय काम आहे? हा तपासाचा विषय आहे. आम्ही मुद्दा मांडला आहे. सरकारने चौकशी करावी. महाराणा प्रताप सेनेने राजस्थान सरकार, राज्यपाल, केंद्र सरकार यांना पत्र लिहिले आहे. आठवडाभरात तपास न झाल्यास केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही सेनाप्रमुख परमार यांनी सांगितले. तरीही तोडगा न निघाल्यास मोठे आंदोलन करण्यात येईल. महाराणा प्रताप सेनेचे कार्यकर्ते 2000 च्या संख्येने अजमेरला जाऊन आंदोलन करतील. तसेच कोर्टातही जाऊ असेही त्यांनी म्हटलं आहे.
समितीने हा दावा फेटाळून लावला
त्याचवेळी, दर्ग्याच्या खादिमांची संघटना अंजुमन सय्यद जदगन कमिटीने हा दावा साफ फेटाळून लावला आहे. साडेआठ बिघा पसरलेल्या ख्वाजा गरीब दर्गा संकुलात असा कोणताही भाग नसल्याचा दावा अंजुमन कमिटीने केला आहे. ज्याचे छायाचित्र दर्ग्यात स्वस्तिक असल्याचा दावा करून व्हायरल होत आहे. या वादावर कायदेशीर मार्गाने तोडगा काढण्यासाठी कोणाला दर्ग्यात यायचे असेल तर अंजुमन समिती त्याचे स्वागत करेल, असेही समितीने म्हटले आहे.