Dilip Walse Patil on Ketaki Chitale : केतकी चितळेवर कारवाई होणारच, गृहमंत्री वळसे-पाटलांकडून स्पष्ट; केतकीविरोधात कोणत्या ठिकाणी गुन्हे?
केतकीविरोधात अनेक ठिकाणी तक्रार तर पुणे, कळवा, गोरेगाव आणि बीडमध्ये गुन्हाही दाखल झाला आहे. अशावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारलं असता 'हे सगळं जाणूनबुजून केलं जात आहे, यावर नक्की कारवाई होणार', असा वळसे-पाटील यांनी स्पष्ट केलंय.
नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या जातीवादाचा आणि नास्तिकतेचा गंभीर आरोप करण्यात आला. त्यानंतर आता अभिनेत्री केतकी चितळेनं (Ketaki Chitale) पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट लिहिली आहे. केतकीच्या फेसबुक पोस्टनंतर आता राज्याच्या राजकारणात खळबळ माजलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून केतकीच्या पोस्टचा तीव्र शब्दात विरोध केला जातोय. इतकंच नाही तर केतकीविरोधात अनेक ठिकाणी तक्रार तर पुणे, कळवा, गोरेगाव आणि बीडमध्ये गुन्हाही दाखल झाला आहे. अशावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना विचारलं असता ‘हे सगळं जाणूनबुजून केलं जात आहे, यावर नक्की कारवाई होणार’, असा वळसे-पाटील यांनी स्पष्ट केलंय.
केतकी चितळे ठाणे पोलिसांच्या ताब्यात
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केतकी चितळेवर कारवाई होणारच असं स्पष्ट केल्यानंतर ठाणे पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे केतकीला शरद पवार यांच्यावरील आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट भोवण्याची शक्यता आहे.
केतकी चितळेची पवारांबाबत पोस्ट काय?
तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll
ठेचून काढत नाही तोपर्यंत ही विषवल्ली वाढतच जाणार – आव्हाड
‘पवारसाहेबांवर अनेकवेळा टीका झाली. तेव्हा आम्ही बोललो. मात्र शरद पवार यांच्या आजाराबाबत, त्यांच्या शारिरिक स्थितीबाबत बोलणं आणि नरक मिळावा अशी प्रार्थना करणं, हे एका स्त्रीला शोभण्यासारखं नाही. स्त्री ही मातेसमान असते. पवारांबाबत जे भयंकर लिहिलं आहे, ते शब्द तोंडातून निघतही नाहीत. असं का लिहावं वाटतं हा संशोधनाचा विषय आहे. इतिहासात भगिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांवरही टीका केली होती. आम्ही पहिल्याच फटक्यात गांभीर्यानं घेत नाही. लोक मला सांगत आहेत की कशाला गांभीर्यानं घेता. वयाच्या 83 व्या वर्षी मैदानात उतरणारा तुमचा बाप, त्याच्यावर चालून जाणारी विकृती कुणी असेल तर त्यांना रोखायला हवं. नाहीतर अशी वाढत जाणारी विषवल्ली जोपर्यंत ठेचून काढत नाही तोपर्यंत विषवल्ली वाढतच जाणार. त्यामुळे हे विष संपवलं नाही तर ते समाजाला संपवून टाकेल’, असा सूचक इशाराच जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय.