एकनाथ शिंदे यांचं डायरेक्ट नाव घ्यायला यांची फाटते, त्यामुळे पडद्याआडून बोलतात; शिंदे गटाच्या आमदाराचं वक्तव्य
Chhatrapati Sambhaji Nagar News : संजय राऊत पिसाळलेला कुत्रा, त्यांची लायकी नाही, ते चावले म्हणून आम्ही चावणार नाही; शिंदे गटाच्या आमदाराचा घणाघात
छत्रपती संभाजीनगर | 07ऑगस्ट 2023 : विरोधक हे निर्ढावलेले लोक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं डायरेक्ट नाव घ्यायला यांची फाटते. त्यामुळे पडद्या आडून बोलत असतात. टीका करत असतात. पण समोर येऊन बोलण्याची आणि शिंदे यांचं नाव घेण्याची ताकद कुणाच्यातही नाही, असं म्हणत शिवसेनेचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडी आणि विशेष करून ठाकरे गटावर टीका केली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये टीव्ही 9 मराठीशी बोलताना आमदार संजय शिरसाट यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावरही शिरसाट यांनी जहरी टीका केली आहे.
संजय राऊत हे पिसाळलेला कुत्रा आहेत. त्यांची लायकी नाही. ते चावले म्हणून आम्ही चावणार नाही, असाही घणाघात संजय शिरसाट यांनी केला आहे.
आता संजय राऊत शरद पवारांचं नाव घेत नाही. अजित पवार भाजपसोबत आल्यापासून त्यांची वाचा बंद झाली आहे, असाही शाब्दिक हल्ला संजय शिरसाट यांनी केली आहे.
उध्दव ठाकरे यांना इतिहासाची आठवण येत आहे. पण त्यांना इतिहासाची फार माहिती नाही. पण या सगळ्याचा आता लोकांना कंटाळा आला आहे, असंही ते म्हणाले.
विरोधकांच्या इंडिया आघाडीची येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीला देशभरातील महत्वाचे नेते येणार आहेत. राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह देशभरातील विरोधा पक्षांचे नेते मुंबईत येणार आहेत. या बैठकीचं यजमानपद टाकरे गटाकडे आहे. 31 ऑगस्ट या नेत्यासाठी ठाकरे गटाकडून डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यावरही संजय शिरसाट यांनी टीका केली आहे.
31 तारखेला राहुल गांधी आल्यावर त्यांना जेवायला काय वाढायचं? याची उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना चिंता आहे. राहुल गांधी यांच्या उजव्या बाजूला संजय राऊत यांनी थांबायचं की उध्दव ठाकरे यांनी थांबायचं याची यांना चिंता सतावते आहे. लोकांच्या प्रश्नांकडे यांचं लक्ष नाही, असं संजय शिरसाटांनी म्हटलं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावावर टीका केली. त्यानंतर त्यांना गुजरात उच्च न्यायालयाकडून दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरवलं आहे. त्यावर शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रीम कोर्टाने निकाल देताना यापुढे अशी वक्तवे करू नयेत, असं सुद्धा सांगितलं आहे. त्यामुळे काँग्रेसचे लोक जल्लोष करत असतील तर आम्हाला त्यात काही देणं घेणं नाही. काँग्रेसला आता किमान लोकशाही कळली असेल, असंही शिरसाट म्हणालेत.