2019 ची निवडणूक, राज्याचं मुख्यमंत्रिपद, शिवसेना-भाजप युती अन् संजय राऊत यांचं वक्तव्य; शिंदे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर
Sanjay Shirsat on Sanjay Raut : राऊत म्हणाले, 2019 मध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केलं, पण भाजपने युती तोडली!; शिंदे गटाचं जोरदार प्रत्युत्तर, काय म्हणाले? वाचा सविस्तर...
छत्रपती संभाजीनगर | 13 ऑगस्ट 2023 : उद्धव ठाकरे यांनीच एकनाथ शिंदे यांचं नाव पुढे केलं आणि त्यांच्यावर जबाबदारी दिली. आमच्यातील काही पोपटपंचीनी एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री झाले तर ते संघटना हातात घेतील, असा किडा उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात भरवला. एकनाथ शिंदे यांच्या नावाला कुठही विरोध नव्हता. यांचाच कल युती तोडण्याकडे होता. एकनाथ शिंदे यांच्या नावाला उद्धव ठाकरे गटाचा विरोध होता. यामुळे कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले. यात संजय राऊत शरद पवार यांचे दुत बनले, असं म्हणत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी 2019 च्या राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊतने ठरल्याप्रमाणे खोट बोलण्याची प्रथा नेहमीप्रमाणे कायम ठेवली आहे. पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाची घोषणा उद्धव ठाकरे यांच्यासमोर किती सभांमध्ये झाली होती. सत्तेचं वाटप हे 50-50 व्हायला हवी हे सर्वांना मान्य होतं, असंही शिरसाट म्हणालेत. आज सकाळच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी एक वक्तव्य केलं. त्याला शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
2019 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार होते. पण भाजपने त्यांना मुख्यमंत्री करण्यास नकार दिला. त्यांनी विचारलं मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार कोण? आम्ही एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं. कारण तेव्हा ते विधीमंडळाचे नेते होते. पण भाजपने शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिला. युती तुटण्याचं कारण शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देणं हे होतं, असा दावा संजय राऊत यांनी आज केला. त्याला संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे.
मीही अनेक वेळा सांगतो. आम्हाला सुद्धा संजय राऊतांचं नाव सतत घेणं आवडत नाही. परंतू त्यांनी काय बंगाली जादू केली माहिती नाही. त्यांना खरंच मानसोपचारांची गरज आहे. कोणताही फॉर्म्युला ठरला नाही, ही टेबल न्यूज आहे, असं म्हणत शिरसाट यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.
काल शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या भेटीमुळे या सर्व चर्चांना उधाण आलं आहे. ही राजकीय भेट असावी असा माझा अंदाज आहे. आता त्यांनी आतमधल्यांनी पळून जाऊ नये म्हणून त्यांनी दरवाजे लावून घेतले आहेत. त्यांनी स्वतः सह इतरांना कोंडून घेतलं आहे, असं म्हणत अजित पवार आणि शरद पवार यांच्या काल पुण्यात झालेल्या भेटीवर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.