नाशिक : शुक्रवारपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे. ते पहिल्या दिवशी नाशिकमध्ये (Nashik) पोहोचले तर आज शनिवार आणि रविवार असे दोन दिवस औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर असणार आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आपल्या दौऱ्यासाठी निवड केलेल्या दोनही शहरांच्या महापालिका निवडणुका येत्या काही दिवसांतच होणार आहेत. या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या दौऱ्यामध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, हे सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. विकास करणारे सरकार आहे. शिवसेना भाजप युतीचे हे सरकार निश्चितच सर्वसामान्य जनतेला न्याय मिळून देईल. मी तुमच्या हक्कासाठीच मंत्रालयात बसल्याचेही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. दरम्यान यावेळी नाशिकचे अनेक वर्षांपासून रखडलेली विकास कामे मार्गी लावणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे हे आज आणि उद्या असे दोन दिवस औरंगाबाद दौऱ्यावर असरणार आहेत. औरंगाबाद हा शिवसेनेचा गड मानला जातो. मात्र आता या गडाला सुरुंग लावण्याची तयारी एकनाथ शिंदे यांनी सुरू केल्याचे चित्र आहे. औरंगाबादमध्ये एकनाथ शिंदे जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. औरंगाबादमधील अनेक शिवसेनेचे पदाधिकारी हे शिंदे गटात सामील झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या औरंगाबाद दौऱ्यानंतर देखील काही शिवसेनेचे पदाधिकारी हे शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.
दरम्यान औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी भाजपा आणि शिंदे गटाची युती होणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. विश्वसनीय सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार शिंदे गट आणि भाजपात युतीबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा देखील झाली असल्याची माहिती समोर येत आहे. लवकरच युतीबाबत तसेच जागावाटपांबाबत रणनीती ठरण्याची शक्यता आहे. औरंगाबाद महापालिकेत भाजपा आणि शिंदे गटाची युती झाल्यास शिवसेसमोरी आव्हाने वाढण्याची शक्यता आहे. मात्र अशा युतीने आम्हाला काहीही फरक पडणार नसून, आम्ही औरंगाबादेत स्वबळाची तयारी केल्याचे शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.