Ashadhi Wari : यंदाचा पालखी सोहळा कोरोना निर्बंधमुक्त होणार! 15 लाख भाविक पंढरपूरला जमणार, अजितदादांकडून सविस्तर माहिती
अजित पवार यांच्या उपस्थितीत आज वारीच्या नियोजनाबाबत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला सोलापूर आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, तसंच आळंदी, देहू आणि पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष उपस्थित होते.
पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे (Corona Outbreak) मागील दोन वर्षे आषाढी वारी होऊ शकली नाही. मात्र, यंदाचा पालखी सोहळा कोरोना निर्बंधमुक्त होणार आहे. यंदा आषाढी वारीसाठी (Ashadhi Wari) 15 लाख भाविक पंढरपुरात जमतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी 25 हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तसंच वारीसाठी अधिकच्या बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलीय. अजित पवार यांच्या उपस्थितीत आज वारीच्या नियोजनाबाबत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला सोलापूर आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री, तसंच आळंदी, देहू आणि पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष उपस्थित होते.
बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाचं नियोजन केलं. वारीची सर्व तयारीही व्यवस्थित झाली आहे. कोरोनामुळे दोन वर्षे वारीवर बंधनं आणावी लागली होती. यंदा 15 लाख भाविक जमतील असं अजित पवार म्हणाले. आजच्या बैठकीत अजित पवार यांच्यासमोर पालखी मार्गांचं वेळापत्रक सादर करण्यात आलं. तसंच पालखी मार्गात कोणकोणत्या सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याचीही माहिती अजित पवारांना देण्यात आलीय.
वारी दरम्यान वारकऱ्यांसाठी कोणत्या सोयी सुविधा?
>> पालखी मार्गावर दर पाच किलोमीटर अंतरावर शौचालयांची व्यवस्था करण्यात आली.
>> 1 हजार 800 फिरत्या शौचालयांची सुविधा देण्यात आली
>> फिरत्या शौचालयापैकी 50 टक्के शौचालये महिलांसाठी राखीव
>> सॅनिटायझर, औषधं, डॉक्टरांची व्यवस्था पालखी मार्गावरील जिल्हा परिषद विभाग करणार
>> वारीच्या मार्गावरील रस्त्याच्या बाजुची मांसाहार, दारुची दुकानं बंद करण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता
>> वारी काळात एक मोबाईल अॅप तयार करण्यात येणार
>> विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन लाईव्ह मिळण्याची सोय
>> नेहमीपेक्षा अधिक बसेस सोडल्या जाणार
>> 25 हजार स्वयंसेवकांना प्रशिक्षण देऊन त्यांची वारीत नेमणूक केली जाणार
>> दरवर्षीपेक्षा यंदाच्या वारीत पोलिसांची संख्याही अधिक असणार
आळंदीला रोज पाणी द्या, अजितदादांचे आदेश
अजित पवार यांच्याकडे वारकऱ्यांना आळंदीला दररोज पाणी द्या, एक दिवसाआड पाणी नको अशी मागणी केली आहे. त्यावर 11 एमएलडी पाणी देऊनही वारकऱ्यांना पाणी का मिळत नाही? असा प्रश्न अजित पावर यांनी अधिकाऱ्यांना विचारला. मला अजिबात कारणं नको. आळंदीला रोज पाणी मिळालं पाहिजे, असं अजितदादांनी अधिकाऱ्यांना बजावलं आहे.