नवी दिल्ली: काँग्रेसचे नेते राहुल गांधी (rahul gandhi) सोमवारी नेपाळला गेले आहेत. हा त्यांचा खासगी दौरा आहे. एका लग्न सोहळ्यासाठी राहुल गांधी नेपाळमध्ये (nepal) आल्याचं सांगितलं जात आहे. काठमांडूच्या मॅरिएट हॉटेलमध्ये ते थांबले आहेत. याच दरम्यान राहुल गांधी यांचा येथील एका प्रसिद्ध पबमधील पार्टीतील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.हा व्हिडीओ नेपाळच्या Lord of the Drinks, Nepal मधला असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजप (bjp) अधिकच आक्रमक झाली आहे. स्वत: भाजप नेत्यांनी हा व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसवर हल्लाबोल चढवला आहे. दरम्यान, या व्हिडीओवर राहुल गांधी किंवा काँग्रेसकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, राहुल गांधी यांच्या या व्हिडीओवरून राजकारण रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
भाजप नेते कपिल मिश्रा आणि अमित मालवीया यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. भाजप प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी या प्रकरणावर काँग्रेसला सवाल केला आहे. राहुल गांधी काय करत आहेत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये हिंसा होत आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. राजस्थान जळत आहे. यावर चिंता व्यक्त करण्याऐवजी राहुल गांधी नेपाळमध्ये आहेत. नाईटक्लबमध्ये पार्टीत दिसत आहेत. भारतातील समस्या जाऊन घेण्यासाठी त्यांनी इथे असायला हवं होतं, असा टोला पुनावाला यांनी लगावला आहे.
काँग्रेस पक्ष संपला आहे. आता राहुल गांधींचा पक्ष असाच चालेल. ते राजकीयदृष्ट्या गंभीर नाहीत. त्यांच्या पक्षाची आणि त्यांची देशाला गरज आहे. असं असताना ते नेपाळमध्ये पार्टी करत आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही राहुल गांधींचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हॅकेशन, पार्टी, हॉलिडे, प्लेजर ट्रिप, प्रायव्हेट फॉरेन व्हिजिट आदी गोष्टी आता देशाला नव्या नाहीत, असा टोला रिजिजू यांनी लगावला आहे.
Rahul Gandhi was at a nightclub when Mumbai was under seize. He is at a nightclub at a time when his party is exploding. He is consistent.
Interestingly, soon after the Congress refused to outsource their presidency, hit jobs have begun on their Prime Ministerial candidate… pic.twitter.com/dW9t07YkzC
— Amit Malviya (@amitmalviya) May 3, 2022
ही राहुल गांधी यांची वैयक्तिक बाब आहे. राहुल गांधी कुणासोबत आहेत? चायनाच्या एजंटांसोबत? चीनच्या दबावाखाली ते ट्विट करतात का? प्रश्न तर विचारले जातील. प्रश्न राहुल गांधींचा नाही तर देशाचा आहे, असं भाजप नेते कपिल मिश्रा यांनी म्हटलं आहे.
जेव्हा मुंबईवर हल्ला झाला होता. तेव्हाही राहुल गांधी नाईट क्लबला होते. आता जेव्हा त्यांचा पक्ष संकटात आहे. तेव्हाही ते नाईट क्लबमध्ये आहेत, असा टोला भाजपच्या सोशल मीडियाचे इंचार्ज अमित मालविया यांनी लगावला आहे.