पवारांची पॉवर कमी, एका खासदाराचे सदस्यत्व रद्द, का घेतला सचिवालयाने निर्णय
लोकसभा सचिवालयाने एका सदस्याचे सदसत्व रद्द केले आहे. यासंदर्भातील अधिसूनाही काढली आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा लोकसभेतील एक खासदार कमी झाला आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar)यांना धक्का बसला आहे. त्यांचा लोकसभेतील एक खासदार कमी झाला आहे. यामुळे त्यांची लोकसभेतील पॉवर अजून कमी झाली आहे. लोकसभा सचिवालयाने एका सदस्याचे सदसत्व (ncp mp disqualified) रद्द केले आहे. यासंदर्भातील अधिसूनाही काढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल (Mohammad Faizal)यांना अपात्र ठरवणारी अधिसूचना जारी केली आहे. फैजल यांना न्यायालयाने हत्येचा प्रयत्न करण्याच्या प्रकरणात दोषी ठरवले होते. या प्रकरणात त्यांना दहा वर्षांची शिक्षा झाली. यामुळे फैजल याचं ११ जानेवारीपासून लोकसभेच्या सदस्यत्व रद्द करण्यात आल्याची माहिती लोकसभा सचिवालयानं दिली.
लक्षद्वीपच्या न्यायालयाने मोहम्मद फैजल यांच्यासह चार जणांना हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली. न्यायलयाच्या या निकालानंतर लोकसभा सचिवालयाने अधिसूचना काढली. त्यात म्हटले आहे की, कावरट्टी येथील सत्र न्यायालयाने दोषी ठरवल्याच्या तारखेपासून ११ जानेवारीपासून लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवले आहे. हा निर्णय भारतीय राज्यघटनेच्या कलम १०२ (१)(ई) आणि लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम ८ मधील तरतुदीप्रमाणे घेतला आहे. मोहम्मद फैजल १६ व्या लोकसभेत निवडून आले होते.त्यांनी मुहम्मद हमदुल्ला सईद यांना पराभूत केले होते.
काय आहे प्रकरण माजी केंद्रीय मंत्री पीएम सईद यांचे जावई मोहम्मद फैजलवर काँग्रेस नेते मोहम्मद सलिया यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. मोहम्मद सलिया यांच्यावर जमावाने हल्ला केला आणि बेदम मारहाण केली.त्यात ते गंभीर जखमी झाले. फैजल यांनीच जमावाचे नेतृत्व केल्याचा आरोप होता. मोहम्मद सलिया यांच्यावर अनेक महिन्यांपासून उपचार सुरू होते. या प्रकरणात ३२जणांना आरोपी केले होते. त्यापैकी चार जणांना दोषी ठरवले त्यात मोहम्मद फैजलचाही समावेश होता.