Navneet Rana: मुख्यमंत्र्यांनी ज्या बीकेसी मैदानावर सभा घेतली, ते मैदान हनुमान चालिसा पठण करून पवित्र करणार; नवनीत राणा पुन्हा शिवसेनेला डिवचणार
Navneet Rana: खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला.
नवी दिल्ली: हनुमान चालिसा पठण (hanuman chalisa) करण्याचं आंदोलन केल्यानंतर तुरुंगात राहावं लागलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) पुन्हा एकदा हनुमान चालिसा पठणाचं आंदोलन करणार आहेत. आता थेट त्या मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी मैदानावर जाऊन हनुमान चालिसाचं पठण करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी ज्या बीकेसी मैदानावर सभा घेतली. त्या मैदानावर आम्ही भव्य सभा घेणार आहोत. या सभेत हनुमान चालिसाचं पठण करून ती जागा पवित्रं केली जाणार आहे, असं नवनीत राणा यांनी सांगितलं. त्यामुळे हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राणा दाम्पत्य आणि शिवसेना आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. हनुमान चालिसा वाचायचा असेल तर काश्मीरमध्ये जा, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांच्या या विधानावरही राणा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काश्मीरमध्ये जाऊन मी हनुमान चालिसा म्हणू शकते तर महाराष्ट्रात का म्हणू शकत नाही? असा सवालच त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.
खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. मुंबई तोडण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांच्या या आरोपात काही तथ्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे हे मुंबईकरांची दिशाभूल करत आहेत. मुंबई कधीच केंद्रशासित होणार नाही. महापालिका निवडणुका आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे असं विधान करत आहेत. मुंबईचा बाप दुसरं तिसरं कोणीच नाही. मुंबई कुणाची मक्तेदारी नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच मुंबईचे बाप आहेत. इतर कुणीच नाही, असा हल्लाबोल नवनीत राणा यांनी केला.
त्यांचे राजीनामे का घेत नाही?
ज्यांचा दाऊदशी संबंध आहे. असा मंत्र्यांचे राजीनामे का घते नाहीत. त्यांना अजून मंत्रिमंडळात ठेवलेच कसे?, असा सवालही त्यांनी केला. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मुख्यमंत्र्यांनी वापरलेल्या भाषेचाही त्यांनी निषेध नोंदवला. आदित्य ठाकरेंना अयोध्या दौऱ्याची तारीख बदलावी लागली. आता वेळही बदलावी लागेल, असंही त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्र्यांनी आव्हान स्वीकारलं नाही
मुख्यमंत्र्यांना मी माझ्याविरोधात लढण्याचं आव्हान केलं होतं. मी त्यांना त्यांचा मतदारसंघ घोषित करण्याचे आवाहनही केलं होतं. पण त्यांनी माझं आव्हान स्वीकारलं नाही. त्यावर एक शब्दही कालच्या सभेत बोलले नाही. उलट आम्ही पळून गेलोय असं म्हणत आहेत. आम्ही कुठेही पळून गेलो नाही. आम्ही निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहोत. पळून जाणं आमच्या रक्तात नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.