श्रद्धा वालकरची हत्या का झाली? दिल्ली पोलिसांनी आरोपपत्रातून उलगडला राज
आफताब पूनावाला याने त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या केली. कारण ती घटनेच्या दिवशी तिच्या दुसऱ्या मित्राला भेटायला गेली होती. त्यामुळे अफताब खूप संतापला. त्यानंतर त्याने श्रद्धाची हत्या केली.
मुंबई : वसईतील श्रद्धा वालकर (Shraddha Walkar Murder News) या तरुणीच्या दिल्लीत (Delhi Murder Case) झालेल्या हत्या प्रकरणाचा पोलिसांचा तपास पुर्ण झाला आहे. श्रद्धा हत्याकांडप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 6 हजार 629 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या आरोपपत्रात नार्को टेस्ट, पॉलीग्राफी आणि डीएनए टेस्टचा अहवालही समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच १५० पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाबही नोंदवले आहेत. आरोपपत्रात श्रद्धाच्या हत्येचे अनेक खुलासे करण्यात आले आहे. १८ मे रोजी श्रद्धा वालकर या तरुणीची तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पुनावाला (Aftab Poonawala) याने हत्या केली होती. आफताबने हत्येची कबुलीही दिली आहे.
दिल्ली पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, आफताब पूनावाला याने त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या केली. कारण ती घटनेच्या दिवशी तिच्या दुसऱ्या मित्राला भेटायला गेली होती. त्यामुळे अफताब खूप संतापला. त्यानंतर त्याने श्रद्धाची हत्या केली.
पोलिसांनी 150 साक्षीदार तपासले
पत्रकार परिषदेला बोलताना सहपोलिस आयुक्त मीनू चौधरी यांनी सांगितले की, पोलिसांनी हा खटला मजबूत करण्यासाठी 150 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. पूनावालावर भारतीय दंड संहिताच्या कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपपत्रानुसार, मेहरौली पोलिस स्टेशनला महाराष्ट्र पोलिसांकडून श्रद्धा वालकर हरवल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर मेहरौली पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. त्यात श्रद्धाच्या वडिलांची चौकशी करण्यात आली.
नऊ पथकाने केला तपास
पूनावाला आणि वालकर हे शेवटचे मेहरौली भागात भाड्याच्या घरात दिसले होते. त्या आधारे पूनावाला याची चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर 12 नोव्हेंबर रोजी त्याला अटक करण्यात आली. तपासादरम्यान डीसीपी (दक्षिण) यांच्या नेतृत्वाखाली नऊ पथके आणि विशेष तपास पथक (एसआयटी) देखील स्थापन करण्यात आले होते. हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली आणि हरियाणातील गुरुग्राममध्येही टीम पाठवण्यात आली होती. आफताबने श्रद्धाच्या शरीराचे तुकडे केले होते. त्याचा शोध छत्तरपूरच्या मेहरौली जंगल परिसरात घेतला. त्यात पोलिसांना काही हाडे सापडली.
तपासासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर
पोलिसांनी तपासासाठी वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला. तपासादरम्यान, एफएसएल, सीएफएसएल आणि गुन्हे पथकाने गुन्ह्याच्या ठिकाणाची पाहणी केली. रक्ताचे नमुने आणि हाडांच्या चाचण्या केल्. डीएनए टेस्टही करण्यात आल्या. डीएनए तपासणीसाठी प्रगत तंत्राचा वापर करण्यात आला. मोबाइल फोन, कॅमेरे आणि लॅपटॉप, कॉल डिटेल रेकॉर्ड आणि जीपीएस लोकेशनसह अनेक डिजिटल पुरावे तपासण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. डीसीपी म्हणाले, “आमच्याकडे परिस्थितीजन्य पुरावे आहेत. आमच्याकडे साक्षीदार आणि डिजिटल आणि फॉरेन्सिक पुरावे आहेत. सर्व चाचण्या आमच्या तपासाला पाठिंबा देतात.”