प्रचंड वेदना, सात वर्षांची प्रतीक्षा, चार जिल्ह्यांचे पोलीस आणि ते दोन तास…
एकेक दिवस करता करता तब्बल 12 वर्षे तो वेदनांचा त्रास ती सहन करत होती. जवळपास 12 वर्षे तिच्यावर उपचार सुरू होते. उपचार करणारे डॉक्टर तिला वेदनांपासून मुक्ती मिळावी यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. पण, तिचा आजार बळावतच होता. सोबत तिच्या वेदनाही...
इंदूर : इंदूरच्या सेल्बी हॉस्पिटलमध्ये एक मुलगी दाखल झाली होती. बऱ्याच दिवसांपासून ती आजारी होती. तिचा आजार भयानक होता. आजाराच्या प्रचंड वेदना ती सहन करत होती. एकेक दिवस करता करता तब्बल 12 वर्षे तो वेदनांचा त्रास ती सहन करत होती. जवळपास 12 वर्षे तिच्यावर उपचार सुरू होते. उपचार करणारे डॉक्टर तिला वेदनांपासून मुक्ती मिळावी यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. पण, तिचा आजार बळावतच होता. सोबत तिच्या वेदनाही… अखेर डॉक्टरांनी तिचे डायलिसिस केले. आठवड्यातून 2 वेळा डायलिसिस अशा अवस्थेत तिने 12 पैकी 7 वर्ष काढली.
इंदूरला ती मुलगी अशी आयुष्याशी झुंज देत असताना दुसरीकडे मात्र घटना घडली होती. मध्यप्रदेशमधीलच भोपाळ येथे एका ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याचे कारण ब्रेन डेड असे दिले. पुष्पलता जैन असे या 62 वर्षीय ब्रेन डेडमुळे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव. जैन कुटुंबीयांनी त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.
अवयवदान करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर सर्व औपचारिकता पूर्ण केली गेली. यकृत, दोन किडनी आणि डोळे दान करण्यात आले. अवयवदानाची तयारी करण्यात आली. पुष्पलता जैन यांचे डोळे आणि यकृत भोपाळमध्येच दान करण्यात आले. तर, किडनीसाठी योग्य अशा पेशंटचा शोध सुरु झाला.
इंदूर सोसायटी फॉर ऑर्गन डोनेशन मुस्कान ग्रुपचे जीतू बागानी याना ही माहिती मिळाली. त्यांनी लगेच जैन कुटुंबियांशी संपर्क साधला. जैन कुटुंबीयांनी किडनी देण्याची तयारी दाखविली आणि जैन यांच्या किडनीचा प्रवास भोपाळ ते इंदौर असा सुरु झाला.
200 किलोमीटरचा ग्रीन कॉरिडॉर
भोपाळ ते इंदूर हा प्रवास 200 किमी इतका आहे. या प्रवासात काही अडचण येऊ नये यासाठी विशेष ग्रीन कॉरिडॉर बनविण्यात आला. 10 मे रोजी सकाळी 6 वाजता ग्रीन कॉरिडॉर बनवून रुग्णवाहिकेमधून निघालेली ही किडनी इंदूरला सकाळी 8 वाजता पोहोचली.
ते दोन तास आणि प्रतीक्षा संपली
डॉक्टरांचे पथक किडनी घेऊन सकाळी 6 वाजता निघाले. ग्रीन कॉरिडॉरमुळे अवघ्या दोन तासांत ती रुग्णवाहिका इंदूरला पोहोचली आणि सेल्बी हॉस्पिटलमध्ये गेली 12 वर्ष वेदनांचा त्रास करून आयुष्याशी झुंजत असलेल्या त्या 19 वर्षीय योगिता भंवर हिची प्रतीक्षा अखेर संपली.
यशस्वी किडनी प्रत्यारोपण
सेल्बी हॉस्पिटलमध्ये किडनी पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी वेळा वाया घालविला नाही. योगिता भंवर हिचे सकाळी 8.20 वाजता ऑपरेशन सुरू झाले. दुपारपर्यंत किडनी प्रत्यारोपणचे ऑपरेशन यशस्वी झाले. किडनी प्रत्यारोपणानंतर तिला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या प्रत्यारोपणानंतर योगिताची आई केशर अंकुश भंवर यांच्यासह तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत.
ग्रीन कॉरिडॉरसाठी चार जिल्ह्यांच्या पोलिसांच्या हाती कमान
भोपाळ ते इंदूर या २०० किलोमीटरच्या प्रवासासाठी खास ग्रीन कॉरिडॉर बनविण्यात आला होता. किडनी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अडथळा येऊ नये यासाठी इंदूर, देवास, सीहोर आणि भोपाळ अशा चार जिल्ह्यांच्या पोलिसांचे पथक कार्यरत होते. ट्रॅफिक जाम न होता रुग्णवाहिका इंदूरला पोहोचावी म्हणून सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तेथला मार्ग मोकळा व्हावा, तसेच, मार्गावर येणाऱ्या टोल नाक्यांनाही त्याची माहिती देऊन एक रांग राखीव ठेवण्यात आली होती.
सात वर्षांची प्रतीक्षा संपली
मध्यप्रदेशात अवयवदानाबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचा परिणाम दिसून आला. मृत महिलेच्या कुटुंबीयांच्या निर्णयामुळे इंदूरमधील त्या तरुणीला नवजीवन मिळाले. पुष्पलता जैन यांच्या किडनीमुळे योगिताची सात वर्षांची प्रतीक्षा संपली असेच या घटनेमुळे म्हणावे लागेल.