यवतमाळमध्ये 254 घरांची पडझड, हवामान विभागाकडून रेड अलर्ट, पावसाचं अक्षरश: थैमान
यवतमाळ जिल्ह्यामध्ये सध्या प्रचंड पाऊस सुरु आहे. विशे, म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात उद्यादेखील पाऊस सुरु राहण्याची शक्यता आहे. कारण हवामान विभागाकडून जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
यवतमाळ | 27 जुलै 2023 : यवतमाळ जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील 23 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाल्यानंतर जिल्ह्यात 254 घरांची अंशत: पडझड झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. बाधितांना तात्पुरत्या निवारागृहात ठेवण्यात आलं आहे. जिल्ह्यातील राळेगाव, कळंब, वणी तालुक्यात पुरपरिस्थीती निर्माण झाली आहे. राळेगाव तालुक्यातील पिंपळगाव-सराई रस्ता, सराई-चिखली रस्ता, दापोरी-कासार रस्ता, नायगाव ते कळंब रस्ता, आर्णी तालुक्यातील घनगाव रस्ता, कळंब तालुक्यातील खोरद रस्ता पाण्याखाली गेले आहेत. या भागांमघ्ये पुलावरुन पाणी वाहणं सुरु झाल्यामुळे काही कालावधीसाठी पूल बंद करण्यात आले होते.
यवतमाळ जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी
यवतमाळमध्ये अजूनही पाऊस सुरु आहे. विशेष म्हणजे हवामान विभागाकडून यवतमाळ जिल्ह्याला उद्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्यासह मुंबई आणि गडचिरोली जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, नागपूर, गोंदिया, भंडारा, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बाधित कुटुंबांची तात्पुरत्या निवारागृहात व्यवस्था
जोडमोहा येथील नाल्याला पूर आल्यामुळे नाला काठावरील 10 ते 12 कुटुंबीयांना समाज मंदीरात तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरीत करण्यात आलं आहे. यवतमाळ शहरात अतिप्रमाणात पाऊस झाल्यामुळे बांगर नगर परिसरातील नाल्यामध्ये एक महिला तोल जाऊन वाहुन गेली आहे. तालुकास्तरावरुन प्राप्त माहितीनुसार, काही घरांची पडझड झाली आहे. त्यात कळंब तालुक्यातील १० घरे, यवतमाळ ३२, पुसद ३, उमरखेड ८७, बाभुळगाव १, वणी १६, महागाव २७, केळापुर २, घाटंजी ७६ असे एकूण २५४ घरांची अंशत: पडझड झाली आहे.
पुरस्थितीची पाहता शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. सर्व विभागप्रमुख आणि त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना पूरस्थिती पाहता मुख्यालय न सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना जवळच्या सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश तालुका अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
अडकलेल्या शाळकरी मुलांना सुरक्षित बाहेर काढले
झरी तालुक्यातील पैनगंगा नदीवरील दिग्रस अदिलाबाद पुलावरुन पूर असल्यामुळे या रोडवरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. या रस्त्याला पर्यायी रस्ता पाटणबोरी-हैद्राबाद उपलब्ध असून त्यावरुन वाहतूक सुरु आहे. यवतमाळ तालुक्यातील सायखेडा येथील एक व्यक्ती नाल्यात अडकली होती. स्थानिक बचाव पथकाचे व्यक्तीस बाहेर काढले. राळेगाव तालुक्यातील आष्ठाणा येथील नाल्याच्या पुरात २ शाळेकरी मुले अडकले होते. स्थानिक पथकाने पुराच्या पाण्यातून त्यांना सुरक्षित बाहेर काढले.
नागरिकांनी दक्षता बाळगावी
जिल्ह्यातील बहुतांश पुलावरुन पाणी वाहत आहे. त्यामुळे पुलाच्या पाण्यामधून गाडी टाकण्याचे धाडस नागरिकांनी करु नये. जिल्ह्यातील प्रकल्प हे 50 टक्क्याच्यावर भरले असून काही प्रकल्पामधून विसर्ग सुरू आहे. नागरिकांनी अशा ठिकाणी निसर्ग पर्यटन बघण्याकरिता जाणे टाळावे. बांधकाम सुरू असलेल्या अर्धवट इमारतीमध्ये नागरिकांनी आश्रय घेणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.