‘..तर टोल अजिबात घेऊ नका’, वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्तांचा टोल नाक्याला आदेश
वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर ही समस्या तर अतिशय प्रकर्षाने जाणवते. मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी बायपास चौकापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी अनेकवेळा झालेली असते. मुलुंडपासून कल्याणपर्यंत ही वाहतूक कोंडी बघायला मिळते. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होतात.
ठाणे | 28 ऑगस्ट 2023 : राज्यात टोल नाक्यांविरोधात मनसेकडून करण्यात आलेलं आंदोलन सर्वश्रूत आहे. काही वर्षांपूर्वी मनसेकडून टोल नाक्यांविरोधात खळखट्याक आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर राज्यातील अनेक टोल नाके बंद झाली होती. विशेष म्हणजे मनसेकडून आतादेखील मुंबई-गोवा महामार्गावर आक्रमकपणे आंदोलन केली जात आहे. मनसे कार्यकर्त्यांनी गेल्या आठवड्यात काही टोल नाक्यांवर तोडफोड केल्याची बातमी समोर आली होती. मुंबई-गोवा महामार्गाचं काम लवकरात लवकर व्हावं आणि चांगल्या दर्जाचं व्हावं, या मागणीसाठी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यानंतर आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर मुलुंडच्या पुढे नाशिकच्या दिशेला प्रचंड वाहतूक कोंडी समस्या उद्भवते. ही वाहतूक कोंडी दोन्ही बाजूने असते. गेल्या अनेक दिवसांपासूनची ही गंभीर समस्या आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी आता वाहतूक विभाग पुढे सरसावलं आहे. वाहतूक विभागाकडून जड, अवजड वाहनांसाठी काही नियम जारी करण्यात आले आहेत. तसेच मुलुंड टोल नाक्याला देखील महत्त्वाचा निर्देश जारी करण्यात आला आहे.
ठाणे वाहतूक विभागाचे जड, अवजड वाहन चालकांना आणि टोल नाक्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. दिलेल्या वेळेच्या अभावी जड, अवजड वाहने शहरात आढळली तर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा मोठा इशारा वाहतूक विभागाने दिला आहे. तसेच मुलुंड टोल प्लाझाला महत्त्वाचा निर्देश देण्यात आला आहे. कोणतीही गाडी बंद पडल्यास टोल न आकारता सरसकट गाड्या सोडण्यात याव्या, अशी सूचना ठाणे वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी दिली आहे.
वाहतूक विभागाचा नेमका आदेश काय?
मुंबई, नाशिककडे जाणाऱ्या साकेत खाडी पुलाचे दुरुस्थीतीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे. मात्र घोडबंदर, नाशिकवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जड आणि अवजड वाहनांसाठी रात्री 11 ते सकाळी 4 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. तसेच दुपारी 12 ते 4 पर्यंत देखील शहरातून जड, अवजड वाहतुकीसाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र या वेळेशिवाय किंवा या कालावधी व्यतिरिक्त शहरात जड, अवजड वाहने आढळल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा ठाणे वाहतूक विभागाचे उपायुक्त डॉ. विनय कुमार राठोड यांनी दिला आहे. त्यामुळे आता वाहतूक विभाग अलर्ट मोडवर आला आहे, अशी चर्चा सुरु आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास जड, अवजड वाहनांवर कारवाई होणार आहे. तसेच कोणतीही गाडी बंद पडल्यास टोल प्लाझावर टोल न आकारता सरसकट गाड्या सोडण्याचे स्पष्ट निर्देश ठाणे वाहतूक विभागाने दिले आहेत.