तुम्ही खरेदी केलेल्या घराचे कागदपत्र बोगस तर नाहीत ना?, 55 इमारतींच्या परवानग्या बोगस
रूमवर नागरिकांनी कर्जही घेतले आहे. इमारती बनताना पालिकेचे अधिकारी कुठं गेले होते, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
विजय गायकवाड, प्रतिनिधी, पालघर : वसई विरारमध्ये बऱ्याच इमारतींचे बोगस कागदपत्र तयार करण्यात आले. बनावट शिक्के आणि लेटर हेड बनवणाऱ्या टोळीचा भांडाफोड झाल्यानंतर या गोष्टींचा खुलासा झाला. बोगस कागदपत्राच्या आधारे रूम रजीस्टर करून देण्यात आले. बिल्डरांनी नागरिकांना रुम विकल्या आहेत. त्या रूमवर नागरिकांनी कर्जही घेतले आहे. इमारती बनताना पालिकेचे अधिकारी कुठं गेले होते, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. आता आपली इमारत बोगस कागदपत्रांद्वारे बनवले गेल्याचं समजताच येथील रहिवाशांवर दुःखाचा डोंगर कोसळला. येथील बहुतेक सर्व रहिवासी सामान्य कुटुंबातील आहेत.
बोगस कागदपत्र दाखवून फसवलं
नागरिकांनी मोलमजुरी करुन, पै नी पै जमा करून आपलं हक्काचं घरं घेतलं. सुरुवातीला इमारतीचे बोगस कागदपत्र दाखवून नागरिकांना फसवण्यात आले. त्यांना रूम विकल्या गेल्या. नागरिकांनी विश्वास ठेवून रुम खरेदी केल्या.
पालिका इमारत तोडणार का?
आता बोगस कागदपत्राद्वारे इमारत बनवली असल्याचं कळलं. त्यानंतर आपली इमारत पालिका तोडणार या भीतीने नागरीकांना रात रात झोप लागत नाही. डोळ्याला डोळा लागत नाही. सर्व रहिवाशांना आता आपल्या घराची चिंता सतावत आहे.
कारवाई केल्यास करायचं काय?
बोगस इमारतींवर मनपाने कारवाई केल्यास मुलाबाळांना घेऊन काय करायचं असा प्रश्न त्यांना सतावत आहे. विरारच्या सहकारनगर येथील जीवदानी दर्शन अपार्टमेंट, श्री गुरु कृपा अपार्टमेंटमधील रहिवाशांना दुःखाच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. असं मत चंद्रकांत झागुटे, सुनीता गुरवले, श्रृती पाटील, संजय शाहुआ, प्रवीण पवार, दिनेश झा या सहकारनगर येथील रहिवाशांनी व्यक्त केलं.
आणखी किती नागरिकांची फसवणूक होणार?
बिल्डरांनी बोगस कागदपत्राद्वारे इमारती उभ्या केल्या. घर खरेदी करणाऱ्या नागरिकांची फसवणूक केली. ही बाब उघड झाल्यानंतरही विरार पूर्व परिसरात आणखी खुलेआम अनधिकृत इमारती उभ्या राहत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. त्यामुळे वसई, विरार, नालासोपाऱ्यात आणखी किती नागरिकांची फसवणूक होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हे सर्व सुरू असताना महापालिका गप्पा का असा प्रश्न उपस्थित होत आहे.