माळशेज घाटात पिकनिक करायला गेले; शिवसेनेच्या नेत्याची अचानक एक्झिट
क्रिकेटच्या छंदातून त्यांनी स्वतःतील संघटक विकसित केला. त्याचा त्यांना सामाजिक आणि राजकीय अशा विविध क्षेत्रात फायदा झाला.
वसई : शिवसेना ( शिंदे गट) चे माजी नगरसेवक प्रवीण उर्फ बाळू कांबळी हे ४ ऑगस्ट रोजी माळशेज घाटात पावसाळी पिकनिक करायला गेले होते. मित्रपरिवाराच्या सोबत असताना अचानक ह्रदयविकाराचा झटका आला. प्रवीण कांबळी यांनी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात आज सकाळी सात वाजता त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मैत्रदिनाच्या दिवशीच एका जिव्हाळ्याच्या मित्राची अचानक एक्झिट झाली. त्यामुळे त्यांच्या मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एक कष्टाळू वृत्तपत्रीय वितरक ते राजकीय नेता असा त्यांचा आजपर्यंतचा प्रवास आहे.
वसई मनपात होते नगरसेवक
प्रवीण हे 1987 साली वयाच्या पंचविशीत एक वृत्तपत्र वितरक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रेरणा घेतली. 1990 पासून प्रखर आणि कडवा शिवसैनिक म्हणून काम सुरू केले. 1995 साली प्रथम वसई नगरपालिकेत ते नगरसेवक म्हणून निवडून आले.
रायगडावर २५ वेळा चढाई
प्रवीण कांबळी यांनी वयाच्या 60 वर्षाच्या प्रवासात वृत्तपत्र विक्रेता, सामाजिक, राजकीय, गिर्यारोहण, क्रिकेट अशा विविध क्षेत्रात ठसा उमटवला. क्रिकेट आणि गिर्यारोहण यांचा प्रवीण कांबळी यांना छंद होता. त्यांनी रायगडावर 25 वेळा आणि राज्यातील शंभरहून अधिक किल्ल्यांवर चढाई केली आहे.
विविध पक्षांशी जिव्हाळ्याचे संबंध
क्रिकेटच्या छंदातून त्यांनी स्वतःतील संघटक विकसित केला. त्याचा त्यांना सामाजिक आणि राजकीय अशा विविध क्षेत्रात फायदा झाला. त्यांचे केवळ ठाणे, पालघरच नव्हे, तर राज्यातील विविध पक्षीय नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. साताऱ्याची गादी सांभाळणारे महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले महाराजापर्यंत त्यांनी स्नेह जपला होता.
शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारले. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप आल्यामुळे प्रवीण कांबळी अखेर शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाले. आज त्यांच्या मृत्यूने वसई परिसरावर दुःखाचा डोंगर पसरला आहे.
वसई न्यायालयासमोर प्रवीण यांनी भव्य अशा शिवालयाची निर्मिती केली. गोरगरिबांच्या सेवेसाठी शिवालय वाहून दिले. याच शिवालयमधून नगरसेवक पदाची कारकीर्द सुरू केली. सर्वच जातीधर्म आणि सर्वपक्षीय नागरिकांची काम या शिवायलातून प्रवीण कांबळी करीत होते. प्रवीण यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत. 11 मे 2023 रोजी त्यांनी 60 वर्षे पूर्ण केले.