ठाकरे गटाला मोठा झटका, माजी नगरसेविकेचा शेकडो कार्यकर्त्यांस शिंदे गटात प्रवेश; सुनील राऊतांवर गंभीर आरोप
तुमच्या विभागातील हॉस्पिटलचे काम मार्गी लावू. जितका निधी लागेल तो देऊ. तुमच्या वार्डातील काही कामे असेल ती सांगा, ती सर्व कामे आपण करू. मी कुणाची नावे घेत नाही मला सर्वांची कुंडली माहीत आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
ठाणे : ठाकरे गटाला लागलेली फुटीची गळती अजूनही थांबलेली नाही. आता ठाकरे गटाच्या माजी नगरसेविकेने शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला आहे. करंजे यांनी पक्षात प्रवेश करताच त्यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर सुवर्णा कारंजे यांनी ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सुनील राऊत यांनी माझा मानसिक छळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सुवर्णा कारंजे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मीडियाशी संवाद साधला. गेली सहा वर्षे आमदार सुनील राऊत यांनी मला मानसिक त्रास दिला. काम करत असताना काम करू न देणे आणि कुठलेही काम केले तर त्यात हस्तक्षेप करणे सुरू होते. कुठल्याही निर्णयात त्यांनी मला कधी सामील करून घेतले नाही. ज्याठिकाणी सुनील राऊत, संजय राऊत राहतात त्याठिकाणी शिवसेना तीन नंबरला आहे. सुनील राऊत कधीच कुणाच्या पाठी उभे राहिले नाही. उलट त्यांनी त्रास देण्याचंच काम केलं. त्यामुळे विक्रोळी विधानसभा मतदारसंघ पूर्णपणे खिळखिळा झाला आहे. त्यामुळेच मी आज दु:खद अंतकरणाने शिंदे गटात प्रवेश करत आहे, असं सुवर्णा कारंजे यांनी सांगितलं.
हॉस्पिटल उभारणार
माझ्या विभागात हॉस्पिटलची गरज आहे. त्याठिकाणी जागा राखीव असताना देखील आमदारांने मला काही मदत केली आहे. हॉस्पिटलसाठी कितीही निधी लागू दे ते आम्ही देणार, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. त्यामुळे या परिसरात आता लवकरच हॉस्पिटल उभारलं जाईल, असंही त्या म्हणाल्या.
तुम्ही खऱ्या शिवसेनेत
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुवर्णा कारंजे यांचं पक्षात स्वागत केलं. सुवर्णा कारंजे यांचे मनापासून स्वागत करतो. त्यांच्या वार्डामधील समस्या आणि अडचणी तसेच मुद्दामहून आणलेले अडथळे सगळे दूर करण्यात येईल. ज्यांनी निवडून दिलं त्यांची कामं पूर्ण केली पाहिजे हे बाळासाहेबांनी शिकवलं आहे. बाळासाहेब सकळी पावणे आठ वाजता फोन करायचे.
अमुक ठिकाणी अडचणी आहेत. त्या पूर्ण करा, असे आदेश द्यायचे. त्यांचे असे बारीक लक्ष त्यांचे असायचे. त्यांचा फोन आला की आम्ही सगळे उठायचो. जी काय कामं असतील ती पूर्ण करून साहेबांना फोन करायचो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सुवर्णाताईंनी त्यांना आलेला अनुभव कथन केला आहे. आता तुम्ही खऱ्या आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेत आला आहात, असं ते म्हणाले.