Sambhaji Brigade : नवीन आहोत, पण गाफील नाही; तुम्हाला संभाजी ब्रिगेडची एवढी दहशत का? संतोष शिंदेंचा भाजपाला सवाल
आगामी निवडणुका शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र लढवणार असल्याचे काल संयुक्त पत्रकार परिषदेत दोघांनीही सांगितले. याचा शिवसेना तसेच संभाजी ब्रिगेड दोघांनाही फायदा होणार असल्याची चर्चा आहे.
पुणे : शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युतीमुळे भाजपाची झोप उडाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) का तुमचा पोटशूळ उठला आहे? का संभाजी ब्रिगेडची एवढी भीती वाटते? झंडू बाम घेऊन ठेवा, कारण तुमची अजून झोप उडवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे (Santosh Shinde) यांनी दिला आहे. ते पुण्यात बोलत होते. एका दिवसाचे एवढे टेन्शन तुम्हाला आले आहे. मात्र जेव्हा आम्ही तुमच्यासारख्या जातीयवादी, मनुवादी विचारांच्या विरोधात आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरू, त्यावेळी तुमची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जवळ झेंडू बाम ठेवा. संभाजी ब्रिगेडला (Sambhaji Brigade) किती टक्के मतदान पडले, किती डिपॉझिट जप्त झाले, असे सवाल विचारणाऱ्या भाजपाचा समाचार यावेळी संतोष शिंदे यांनी घेतला.
‘लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत’
आगामी निवडणुका शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र लढवणार असल्याचे काल संयुक्त पत्रकार परिषदेत दोघांनीही सांगितले. याचा शिवसेना तसेच संभाजी ब्रिगेड दोघांनाही फायदा होणार असल्याची चर्चा आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत जात असल्याचे काल संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केले होते. मात्र या युतीवर भाजपाने टीका केली होती. खिल्ली उडवली होती. त्याला संभाजी ब्रिगेडने प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले संतोष शिंदे?
‘सतत नशेमध्ये बोलून चालत नाही’
भाजपावर टीका करताना संतोष शिंदे म्हणाले, की आम्ही पहिल्यांदा निवडणूक लढवली. त्यामुळे किती टक्के मतदान पडले, किती डिपॉझिट जप्त झाले, असे भाजपा विचारत आहे. पहिल्याच निवडणुकीत बहुमताची अपेक्षा कशी काय करता, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला आहे. महाराष्ट्रात सत्तेत यायला किती वर्षे लागली? सतत नशेमध्ये बोलून चालत नाही. संभाजी ब्रिगेडची एवढी दहशत का? तुम्हाला झोपेतून उठवण्याएवढी दहशत आम्ही कामे करून निर्माण करू, असे ते म्हणाले.
‘आता झेंडा पण आमचा अन् दांडा पण आमचा’
आता झेंडा पण आमचा अन् दांडा पण आमचा आहे. सत्तेत आहात म्हणून सत्तेची मस्ती दाखवू नका. संविधानविरोधी काम, लोकशाही संपवण्याचे काम भाजपाने सुरू केले आहे. हे उलथवण्यासाठी आणि संघाची विचारधारा नष्ट करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचा जन्म झाला आहे. आम्ही नवीन आहोत, मात्र गाफील नाही, असा इशारा त्यांनी भाजपाला दिला आहे.