Raju Shetti : सर्वच कामं प्रशासन करणार असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची गरजच काय? शेतकऱ्यांच्या प्रश्नी राजू शेट्टींचा सत्ताधाऱ्यांना सवाल
राज्याला अजून कृषीमंत्री नाही. मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. दोनच लोक सरकार चालवत आहेत. पावसाळा आणि पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना मदतीची अधिक गरज आहे, असे राजू शेट्टी म्हणाले.
अभिजीत पोटे, पुणे : प्रशासनावर किती अवलंबून राहायचे? सर्वच कामे प्रशासन करणार असेल तर मंत्रिमंडळाची किंवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची तरी गरजच काय, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. राज्यात अतिवृष्टी आणि त्यानंतरच्या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मात्र अद्याप शेतकऱ्यांना (Farmers) मदत मिळालेली नाही. पंचनामे झालेले नाहीत. मुख्यमंत्र्यांकडूनदेखील संपूर्ण नुकसानग्रस्त भागाची पाहणी अद्याप झालेली नाही. सरकार अतिवृष्टी जाहीर करायला तयार नाही, यावर राजू शेट्टी बोलत होते. 50 हजार रुपये नियमित कर्ज भरणाऱ्यांना 1 जुलैला मदत मिळण्याची घोषणा झाली होती. परंतू त्या निर्णयाला स्थगिती दिली. नंतर मदत देऊ असे सांगण्यात आले. कॅबिनेटमध्ये निर्णय (Cabinet decision) झाला. मात्र अद्याप मदत मिळाली नाही, असे शेट्टी म्हणाले.
आंदोलनाचा इशारा
राज्याला अजून कृषीमंत्री नाही. मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. दोनच लोक सरकार चालवत आहेत. पावसाळा आणि पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना मदतीची अधिक गरज आहे. अशावेळी चालढकल आणि दिरंगाई होत असेल, तर ही दुर्दैवी बाब आहे. याबद्दल शेतकऱ्यांनीही विचार करायला हवा. संताप आणणारी ही गोष्ट आहे, अशी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली. दरम्यान, शेतकऱ्यांना ही मदत झाली नाही, तर येत्या 9 ऑगस्टला क्रांतीदिनी राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
‘लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला किळस येईल’
शेतकऱ्यांचे प्रश्न ज्वलंत आहेत. आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांना आधाराची गरज आहे. त्या काळामध्ये हा सत्तेचा सारीपाट मांडून पोरखेळ चालू केलेला आहे. लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला किळस येईल, असा हा प्रकार असल्याचा घणाघात त्यांनी राज्य सरकारवर केला. मलाच नाही, तर राज्यातील जनतेला याचा वीट आला आहे, अशी टीका त्यांनी केली.
काय म्हणाले राजू शेट्टी?
‘चुका करणाऱ्या सर्वांचीच चौकशी व्हावी’
संसदेत झालेल्या गदारोळावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही त्यांनी सुनावले आहे. आपल्या देशात उज्ज्वल संसद परंपरा आहे. देशात विविध प्रश्न आहेत. ते प्रश्न मांडावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. एफआरपीप्रश्नी साखर आयुक्तांना भेटणार असल्याचेही ते म्हणाले. तर ठरावीक लोकांची चौकशी होत असेल तर हा ब्लॅकमेलींगचा प्रकार आहे. चुका करणाऱ्या सर्वांचीच चौकशी व्हावी, असे ते म्हणाले.