Raksha Bandhan 2023 : अजित पवार गटातील ‘या’ महिला नेत्याने जयंत पाटील यांना पाठवली राखी; म्हणाल्या, मायेचा धागा…
Raksha Bandhan 2023 : राष्ट्रवादीतील फुटीनंतरही बहीण भावाच्या नात्यातील ओलावा कायम; अजित पवार गटातील 'या' महिला नेत्याने जयंत पाटील यांना राखी पाठवली, म्हणाल्या, आमचं नातं वेगळं. हाच मायेचा धागा राष्ट्रवादी पक्ष...
पुणे | 29 ऑगस्ट 2023 : भावा-बहिणीच्या प्रेमळ नात्याचा सण… नात्यात कितीही दुरावा असला तरी हा सण बहीण भावाला जवळ आणतो. राजकारणातील एकाच पक्षातील दोन वेगवेगळ्या गटातील बहीण भावातील नातं आजही अतूट असल्याचं समोर आलं आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीत दोन गट पडले. अशात जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला. तर रुपाली चाकणकर यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण दोन वेगवेगळ्या पक्षात असतानाही या रुपाली चाकणकर आणि जयंत पाटील या भावा बहिणीच्या नात्यात फरक पडल्याचं दिसत नाही.
जयंत पाटील यांना रुपाली चाकणकर यांनी राखी पाठवली आहे. हाच मायेचा धागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष टिकवून ठेवेल, असं म्हणत रूपाली चाकणकर यांनी राखी पाठवली आहे. जयंत पाटलांना मी राखी पाठवली आहे. कारण राजकारण वेगळं आहे आणि आमचं नातं वेगळं आहे. दरवर्षी जयंत पाटील भाऊबीजेला माझ्या घरी येतात. आम्ही रक्षाबंधन साजरं करतो. यंदाही तो बंध कायम राहील. एक स्त्री आणि माता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच मायेच्या धाग्याने टिकेल, असं मला वाटतं, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.
रूपाली चाकणकर यांनी पुण्यातील PMPL कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन सण साजरा केला. पुण्यातील कात्रज बस डेपोमध्ये रूपाली चाकणकर यांनी रक्षाबंधन साजरं केलं. त्यांनी औक्षण करत PMPL कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या.
पुणे शहरातील 800 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना रूपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नेत्या राख्या बांधणार आहेत. राज्यभर राष्ट्रवादी महिला काँग्रेस उद्या एक धागा मायेचा उपक्रम राबवणार आहे. राज्यभरातील अनेक कर्मचाऱ्यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेस उद्या राख्या बांधणार आहेत.
बीडमध्ये झालेल्या अजित पवार गटाच्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार भाषण केलं. त्यांच्या या भाषणावर जोरदार टीका झाली. त्यावर रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांच्या विधानाचा विपर्यास केला गेला, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.