MNS : ‘ही नैसर्गिक नाही, अकाली पानगळ; अशानं थोडंच झाड पुन्हा बहरणार!’ मनसेच्या योगेश खैरेंची शिवसेनेवर टीका
कुणी कुठल्या पक्षात प्रवेश करावा किंवा कुठल्या पक्षाने कुणाला प्रवेश द्यावा हा वैयक्तिक आणि त्या पक्षाचा अधिकार आहे. पण विषय बाळासाहेबांचा वैचारिक वारसदार कोण यावर येतो तेव्हा त्यावर बोलणे आवश्यक ठरते, असे योगेश खैरे म्हणाले.
पुणे : शिवसेना (Shivsena) हे झाड माननीय बाळासाहेबांनी लावले. नंतर ते मोठे झाले. सध्याच्या शिवसेना पक्षप्रमुखांच्या म्हणण्यानुसार या झाडाची पानगळ झाली आहे. त्यामुळे पालापाचोळा उडून गेला. पण ही नैसर्गिक पानगळ नाही तर झाडाने त्याचा वैचारिक गुणधर्म बदलल्याने झालेली अकाली पानझड आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते आणि सचिव योगेश खैरे (Yogesh Khaire) यांनी केली आहे. झाडाची पानगळ झाली आणि पालापाचोळा उडून गेला, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मुलाखतीत बंडखोरांवर केली होती. त्यावर मनसेने ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. योगेश खैरे यांनी फेसबुक पोस्ट करत ही टीका केली आहे. आता या झाडाला पुन्हा पाने जोडली जात आहेत… कृत्रिमरित्या, असा टोला त्यांनी लगावला आहे.
‘शिवसेनेच्या विचारांशी विसंगतच’
खरेतर कुणी कुठल्या पक्षात प्रवेश करावा किंवा कुठल्या पक्षाने कुणाला प्रवेश द्यावा हा वैयक्तिक आणि त्या पक्षाचा अधिकार आहे. पण विषय बाळासाहेबांचा वैचारिक वारसदार कोण यावर येतो तेव्हा त्यावर बोलणे आवश्यक ठरते, असे ते म्हणाले. शिवसेनेत काल जो सुषमाताई अंधारेंचा प्रवेश झाला तो बाळासाहेबांनी लावलेल्या, मोठे केलेल्या मूळ शिवसेना झाडाच्या वैचारिक गुणधर्माशी विसंगत आहे. फक्त आमच्या झाडाला पुन्हा पालवी फुटत आहे हे दाखवण्यासाठी अशी कृत्रिमरित्या पाने जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण अशाने झाड थोडेच पुन्हा बहरणार आहे, असा सवाल करत महाविकास आघाडीचा प्रयोग झाला त्यावेळीही तो मूळ शिवसेनेच्या विचारांशी विसंगतच होता, असे खैरे म्हणाले.
‘बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान करणारी वक्तव्ये’
या सुषमाताईंची यापूर्वीची वक्तव्य पाहिली, की हे आपल्या लक्षात येईल, हिंदू देवतांची यथेच्छ टिंगल करणे, नवरात्रसारख्या करोडो महिलांच्या भावनिक विषयाची खिल्ली उडवणे, हा भारत आहे हिंदुस्थान नाही हे सतत ठासून सांगणे (खरंतर मा. बाळासाहेब या देशाचा उल्लेख कायम हिंदुस्थान असाच करत) अशी अनेक उदाहरणे आहेत, जी बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान करणारी आहेत. बाळासाहेबांनी शिवसेनेला एक घोषणा दिली, जय भवानी जय शिवाजी.. त्या भवानी मातेचीही टिंगल अनेकदा या ताईंनी केली आहे आणि असे वैचारिक गुणधर्म असणाऱ्या ताईंना शिवसेनेने फक्त पक्षात प्रवेशच दिला नाही तर शिवसेनेच्या उपनेते पदावर आरूढ केले आहे.
‘बाळासाहेब असते तर..’
दुसरीकडे देशात अनेकजण ज्या नुपूर शर्मा यांच्या भूमिकेपासून अंग झटकत होते त्यांच्या मागे नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे उभे राहताना दिसले. आज बाळासाहेब असते तर त्यांनीही हेच केले असते. असो… बाळासाहेबांचा खरा वैचारिक वारसदार कोण, हे अशा अनेक घटनांतून पुढे वारंवार दिसून येईलच, असा टोला खैरे यांनी शिवसेनेला लगावला आहे.