Pandharpur Vitthal Wari : दोन वर्षांनंतर यंदा पायी वारी निघणार, 21 जूनला पालखीचे प्रस्थान
गेली दोन वर्षे कोरोनामुळे पायी वारी झाली नव्हती. यंदा मात्र निर्बंध हटवल्याने दोन वर्षांनंतर पायी वारी निघणार आहे, 21 जूनला पालखीचे प्रस्थान होणार आहे. तसेच वारीचा सोहळाही जाहीर करण्यात आला आहे.
पुणे : कोराना (corona) महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनंतर महाराष्ट्र (Maharashtra) आपल्या पुर्वपदावर आला आहे. त्यांनंतर राज्यातील अनेक कार्यक्रम हे धुमधडाक्यात होत आहेत. आता सगळ्यांबरोबरच राज्यातील वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. वारकरी संप्रदायाचे पंढरपूरच्या पायी वारीचे (Wari) स्वप्न पुर्ण होणार आहे. येत्या 21 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान हे पंढरपूरकडे होणार आहे. यंदा प्रथमच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रंगणार असून धार्मिक कार्यक्रमासह इतर कार्यक्रम धुमधडाक्यात होणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. तसेच पायी वारीची घोषणा झाल्याने वारकरी वारीच्या तयारीला लागले आहेत. तर यासंदर्भातील महत्वाची आषाढी वारी पायी दिंडी पालखी सोहळा नियोजनाची बैठक ही श्री क्षेत्र पंढरपूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात पार पडली.
21 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान हे पंढरपूरकडे होणार आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुखपदी विकास ढगे यांची निवड करण्यात आली आहे. ढगे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंद येथे अडीच दिवस; तर पुणे, सासवड व फलटणमध्ये प्रत्येकी दोन दिवस मुक्कामी असल्याचे सांगितले. त्यामुळे लोणंद, पुणे, सासवड आणि फलटणमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.
वारीचा असा असेल कार्यक्रम
- 21 जून – संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं प्रस्थान
- 22, 23 जून – पुण्यात मुक्काम
- 24, 25 जून – सासवड
- 26 जून – जेजुरी
- 27 जून – वाल्हे
- 28, 29 जून – लोणंद
- 30 जून – तरडगाव
- 1, 2 जुलै – फलटन
- 3 जुलै – बरड
- 4 जुलै – नातेपुते
- 5 जुलै – माळशिरस
- 6 जुलै – वेळापूर
- 7 जुलै – भंडीशेगाव
- 8 जुलै – वाखरी
- 9 जुलै – पंढरपूर
- 10 जुलै – आषाढी एकादशी
येथे होणार रिंगण सोहळा
चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर आणि इसबावी येथे उभे रिंगण सोहळा भरणार असून पुरंदावडे (सदशिवनगर), पानीव पाटी, ठाकुरबुवा आणि बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण होणार आहे.