Monsoon Rain : मान्सूनने पुन्हा वाढवली चिंता, काय आहे हवामान विभागाचा अंदाज
IMD Weather forecast : राज्यात यंदा अजूनपर्यंत समाधानकारक पाऊस झालेला नाही. राज्यात नव्हे तर देशात यंदा पावसाची तूट निर्माण झाली आहे. अजूनही मान्सूनसंदर्भात चिंता वाढवणारी बातमी हवामान विभागाने दिली आहे.
पुणे | 28 ऑगस्ट 2023 : देशात यंदा मान्सून रुसला आहे. अल निनोचा प्रभाव मान्सूनवर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावर्षी जून आणि ऑगस्ट महिन्यात दमदार पाऊस बरसलाच नाही. ऑगस्ट महिन्यात दीर्घ सुटी पावसाने घेतली आहे. देशात यंदा पावसाची तूट आहे. राज्यात सर्वत्र यंदा पावसाने सरासरी गाठली नाही. आता पुणे हवामान विभागाने मान्सून संदर्भात चिंता वाढवणारी बातमी दिली आहे.
कुठे आहे मान्सून
मान्सून आता हिमालयाच्या पायथ्यापर्यंत पोहोचला आहे. पश्चिमी वाऱ्याची गतीही कमी झाली आहे. यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे. परंतु मुसळधार पाऊस कोठेही होणार नाही. दोन दिवस कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. राज्यात कोणत्याही भागात पावसाचा यलो किंवा ऑरेंज अलर्ट दिलेला नाही.
का थांबला आहे पाऊस
देशात पश्चिमी वाऱ्याची गती कमी झाल्यामुळे पावसाचा वेग मंदावला आहे, असे पुणे हवामान विभागाच्या तज्ज्ञ शिल्पा आपटे यांनी सांगितले. यंदा पावसाची सरासरी गाठणे अवघड आहे. यामुळे राज्यावर दुष्काळाचं गडद सावट सध्या दिसत आहे. देशातील पूर्वोत्तर भारतात 17 टक्के कमी पाऊस झाला आहे. मध्य भारतात कमी पाऊस झाला आहे. या ठिकाणी आतापर्यंत 6 टक्के कमी पाऊस झाला आहे. तसेच यंदा दक्षिण भारतात 16 टक्के कमी पाऊस पडला आहे. देशाची एकंदरीत सरासरी पहिल्यास पावसाची तूट 7 टक्के आहे.
राज्यात चिंताजनक परिस्थिती
मराठवाड्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यात जलाशयांची स्थिती ही फार समाधानकारक नाही. धरणांमध्ये जलसाठा पुरेसा झालेला नाही. नांदेडमध्ये ऑगस्ट अखेरीस गतवर्षीच्या तुलनेत २०० मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे. परभणीत हिच परिस्थिती आहे. खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर, यावल अनेक तालुक्यांमध्ये दोन आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे.