एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्वात मोठी घोषणा, महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस ‘या’ दिवशी साजरा होणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यातील पुरस्कार वितरण सोहळ्यात भाषण करताना एक महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांनी राज्य क्रीडा दिवसाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी याबाबतची घोषणा करुन अजित पवार यांच्या दोन महत्त्वाच्या मागण्यादेखील मान्य केल्या आहेत.
पुणे | 28 ऑगस्ट 2023 : ज्येष्ठ दिवंगत पैलवान खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिवस म्हणून घोषित करण्यात यावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर कार्यक्रमात केली. या कार्यक्रमात व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. अजित पवार यांच्या मागणीला एकनाथ शिंदे यांनी दुजोरा दिला आणि आपल्या भाषणात याबाबत मोठी घोषणा केली. पैलवान खाशाबा जाधव यांनी कुस्तीतील पहिलं ऑलिम्पिक पदक भारताला मिळवून दिलं होतं. त्यांनी भारताला 1952 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकून दिलं होतं. त्यांच्या कार्याची दखल घेऊन अजित पवार यांनी महत्त्वाची मागणी केली होती.
पुण्यात छत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचा वितरण सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, राज्यपाल रमेश बैस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात अजित पवार यांनी खाशाबा जाधव यांचा उल्लेख करत महत्त्वाची मागणी केली.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
“महाराष्ट्राच्या मातीतले सुपुत्र, ऑलम्पिक पदक विजेते स्वर्गीय खाशाबा जाधव, ज्यांचा फोटो आपण इथे लावलेला आहे आणि त्यांना आपण सर्वांनी अभिवादन केलेलं आहे. त्यांनी 1952 साली स्वतंत्र भारतासाठी पहिलं वैयक्तिक पदक मिळवलं होतं. त्यांचा जन्म 15 जानेवारी 1925 ला झाला होता. हा दिवस आपण महाराष्ट्र राज्याचा राज्य क्रीडा दिवस म्हणून घोषित करावा”, अशी विनंती अजित पवार यांनी आपल्या भाषणात केली.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“मेजर ध्यानचंद यांच्या जयंती दिनी जसा राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या मातीतला सुपुत्र, ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांनी स्वतंत्र भारतासाठी पहिलं वैयक्तिक पदक मिळवलं. त्यांचा जन्म दिवस 15 जानेवारी 1925 आहे. त्यामुळे 15 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र राज्याचा राज्य क्रीडा दिवस म्हणून मी घोषित करतो”, असं अजित पवार म्हणाले.
पुरस्कारांची रक्कम वाढवली
अजित पवार यांनी आणखी एक मागणी यावेळी केली. अजित पवार यांनी पुरस्काराची रक्कम वाढवण्याची मागणी केली. “मुख्यमंत्री महोदय 1 लाखांची रक्कम 3 लाख रुपये करावी आणि 3 लाखाची रक्कम 5 लाख रुपये करावी”, अशी मागणी अजित पवार यांनी केली. त्यावर एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. “तिजोरीची चावी तुमच्याकडेच आहे, त्यामुळे 1 लाख पुरस्काराची रक्कम आता 3 लाख आणि 3 लाखाच्या पुरस्काराची रक्कम 5 लाख करण्याची घोषणा मी करतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.