भावना गवळी यांचं टेन्शन वाढणार, ठाकरे गटाकडून बड्या नेत्याला उमेदवारी; चुरशीची लढत होणार
वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत होणार आहे.
वाशिम : लोकसभा निवडणुका पुढच्यावर्षी होणार आहेत. या निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. ठाकरे गटानेही शिंदे गटाची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. ज्या मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार आहेत, त्या ठिकाणी ठाकरे गट एकास एक उमेदवार देणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या विरोधात ठाकरे गटाने तगडा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भावना गवळी यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
राज्यातील सर्वच पक्ष 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमदेवारांची चाचपणी करत आहेत. वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी मंत्री संजय देशमुख इच्छूक असून त्यांनी तयारी सुद्धा सुरू केली आहे. येत्या 11 तारखेला संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळमध्ये हुंकार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने काल वाशीममध्ये पदाधिकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे आता वाशिम-यवतमाळमध्ये भावना गवळी विरुद्ध संजय देशमुख असा सामना रंगलेला दिसणार आहे.
चाचपणी सुरू
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे 2019 ला जिंकलेल्या 18 लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट निवडणूक लढवणार असल्याचे सांगत आहेत. तर शिंदेगटात गेलेल्या खासदारांना घेरण्यासाठी उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार देण्याची ठाकरे गटाची तयारी आहे. माजी मंत्री संजय देशमुख लढतीसाठी इच्छूक आहेत. संजय देशमुख यांनीही भावना गवळी यांच्याविरोधात लढण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.
काँग्रेसमधून शिवसेनेत
संजय देशमुख हे दिग्रस विधानसभेचे आमदार होते. तसेच 2002 ते 2004 या काळात ते मंत्रीही राहिले आहेत. पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. शिवसेनेच्या संजय राठोड यांनी त्यांचा पराभव केला होता. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला भावना गवळी यांच्याविरोधातील आयताच उमेदवार मिळाला आहे.
आम्हीच जिंकू
वाशिममध्ये काल झालेल्या बैठकीत संजय देशमुख यांनी वाशिम-यवतमाळची जागा शिवसेनाच जिंकेल असा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच कार्यकर्त्यांना मेळाव्याला येण्याचे आवाहन केलं आहे. यावेळी वाशिमचे जिल्हाप्रमुख सुधीर कव्हर, माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्यासह शिवसैनिकांची मोठी उपस्थिती होती.