संभाजी भिडे यांच्या अडचणी वाढवणारी बातमी, सांगलीत मोठ्या हालचाली
संभाजी भिडे यांच्याविरोधात सांगलीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यामुळे संभाजी भिडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे संभाजी भिडे यांच्याविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर सातत्याने भिडे यांना धक्का देणाऱ्या बातम्या समोर येत आहेत.
सांगली | 3 ऑगस्ट 2023 : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या अडचणी वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर राज्यभरातून टीका केली जात आहे. राज्यातील विरोधी पक्ष संभाजी भिडे यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. संबंधित प्रकरणी महाराष्ट्राचं सर्वोच्च सभागृह असलेल्या विधानसभेतही प्रचंड चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांच्यावर कारवाई केली जाईल, असं आश्वासन दिलं. तसेच भिडे यांच्याविरोधात अमरावतीतील राजापेठ पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आलाय.
राजापेठ पोलिसांनी संभाजी भिडे यांना नोटीस देखील बजावली आहे. भिडे यांच्या वक्तव्यावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. त्यामुळे औरंगाबाद आणि चिपळूण येथे संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमांना पोलिसांनी परवानगी नाकारली. असं असताना आता भिडे यांच्या अडचणी वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात सांगलीत मोठ्या हालचाली घडत आहेत.
सांगलीत नेमकं काय घडतंय?
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी भिडे आणि तथाकथित हिंदुत्ववाद्यांच्याकडून वारंवार थोर महापुरुषांच्या बाबतीत होणाऱ्या वादग्रस्त विधानांप्रकरणी राज्यभरातील पुरोगामी कार्यकर्त्यांची सांगलीत बैठक पार पडली. जेष्ठ विचारवंत भारत पाटणकरांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली.
संभाजी भिडे आणि वादग्रस्त विधान करणाऱ्या तथाकथित हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात पुरोगामी संघटना सुरू करण्याचा, आंदोलनाची चळवळ सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच येत्या 13 ऑगस्टला सांगलीतील महात्मा गांधी पुतळ्यासमोर राज्यव्यापी धरणे आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.
विषारी आणि विकृत प्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी 13 ऑगस्टपासून चळवळ सुरू करण्याचा पुरोगामी नेत्यांच्या बैठकीत निर्णय झालाय. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील पुरोगामी नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक सांगलीमध्ये पार पडली. या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, युवक क्रांती दल, हमाल पंचायत, हिंद मजदूर सभा, मुस्लिम युवक संघटना, मराठा सेवा संघ, आणि संभाजी ब्रिगेड संघटानांचे पदाधिकारी उपस्थित होते.