माजी सैनिक प्लाट पाहण्यासाठी गेले ते घरी परतलेच नाही; नेमकं काय घडलं?
भोर आणि मोतीयानी यांच्यात या आधीही जमिनीच्या व्यवहारातून वाद झाले होते. भोर यांच्या कुटुंबीयांना मोतीयानी याच्यावर संशय व्यक्त केला होता.
अहमदनगर : उपनगर भागातील माजी सैनिक प्लाट पाहण्यासाठी घराबाहेर पडले. त्यानंतर ते घरी परतलेच नाही. माजी सैनिकाच्या पत्नीने याची तक्रार तोफखाना पोलिसांत दाखल केली. माजी सैनिक आणि एका सांध्य दैनिकाचा संपादक यांच्यात जमिनीच्या व्यवहारावरून वाद होता. याची माहिती माजी सैनिकाच्या पत्नीला होती. त्यातून त्यांनी शंका व्यक्त केली. पोलिसांनी योग्य दिशेने तपास केल्यानंतर ती शंका खरी ठरली. माजी सैनिक विठ्ठल भोर यांचा मृतदेह आढळला. तोफखाना पोलिसांसोबत अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपास केला. त्यानंतर विठ्ठल भोर यांचा खून झाल्याची घटना उघडकीस आली.
उपनगर भागातील येथील माजी सैनिक विठ्ठल भोर यांची स्क्रू ड्रायव्हरने भोसकून हत्या करण्यात आली. विठ्ठल भोर यांचा मृतदेह राहता तालुक्यातील लोणी ते तळेगाव रोडवर गोगलगाव शिवारात फेकून देण्यात आला. याप्रकरणी अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी एका सायं दैनिकाचा संपादक मनोज मोतीयानी आणि त्याचा कामगार स्वामी गोसावी याला सेंधवा, मध्यप्रदेश येथून अटक केली. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोर यांच्या पत्नीचा संशय खरा ठरला
माजी सैनिक विठ्ठल भोर हे मनोज मोतीयानी याच्यासोबत निंबळक परिसरात 29 जुलैला प्लाट पाहण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते घरी परतलेच नाही म्हणून त्यांच्या पत्नीने तोफखाना पोलिसात हरवले असल्याबाबत तक्रार दाखल केली होती. भोर आणि मोतीयानी यांच्यात या आधीही जमिनीच्या व्यवहारातून वाद झाले होते. भोर यांच्या कुटुंबीयांना मोतीयानी याच्यावर संशय व्यक्त केला होता.
आरोपींनी दिली खुनाची कबुली
विठ्ठल भोर यांचा मृतदेह आढळला. तोफखाना पोलिसांसोबतच अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा समांतर तपास करत होती. स्थानिक गुन्हे शाखेला संशयित आरोपी मनोज मोतीयानी आणि त्याचा सहकारी स्वामी गोसावी याला सेंधवा, मध्यप्रदेश येथून अटक केली. आरोपींनी स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने भोर यांचा खून केल्याची कबुली दिली. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली.
मनोजविरोधात सहा गंभीर गुन्हे दाखल
आरोपी मनोज मोतीयानी विरोधात अहमदनगर जिल्ह्यात एकूण सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामध्ये विनयभंग, अल्पवयीन मुलीस पळून नेणे, खंडणीच्या उद्देशाने जिवे मारण्याची धमकी देणे, दुखापत करणे आणि जिवे मारण्याची धमकी देणे असे गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांचा समावेश होतो.