..तर हेच खाऱ्या पाण्याचे टँकर दिल्लीत घेऊन जाऊ, नितीन देशमुख यांचा आता थेट केंद्रालाच इशारा
खारपान पट्ट्यासाठी उद्धव ठाकरे यांनी २२९ कोटी रुपये मंजूर केले होते. प्रशासकीय मान्यता झाली. ६५ टक्के काम पूर्ण झाले.
अकोला : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना सकाळी नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर दुपारी त्यांना पोलिसांनी अकोल्यात आणून सोडले. आमदार नितीन देशमुख यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आंदोलन दडपण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना पुढे केल्याचा आरोप केला आहे. माझा जीवाला धोका असल्याचा आरोपही आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी हे आंदोलन आहे. यानंतर हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा आमदार देशमुख यांनी दिला.
अकोल्यात महामोर्चा काढणार
सरकारने स्थगिती उठविली नाही तर आम्ही हेच खाऱ्या पाण्याचे टँकर दिल्ली येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी घेऊन जाऊ. असा इशारा आमदार नितीन देशमुख यांनी दिला आहे. कायदा सुव्यवस्थेच्या विरोधात अकोल्यात महामोर्चा काढणार असल्याचेही देशमुख म्हणाले.
खारपान पट्ट्यासाठी उद्धव ठाकरे यांनी २२९ कोटी रुपये मंजूर केले होते. प्रशासकीय मान्यता झाली. ६५ टक्के काम पूर्ण झाले. अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस हे हिंदुत्वाचे राजकारण करतात. भाजपच्या एका आमदाराने पत्र दिलं म्हणून त्या कामावर स्थगिती दिली.
लोकं खारं पाणी पितात
देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी संपूर्ण जनतेचा विचार केला पाहिजे. एका आमदाराच्या म्हणण्यानुसार त्यांनी स्थगिती दिली. या भागातील हजारो लोकं पायी चालत नागपूरला गेले. या भागातील लोकं खारं पाणी पितात. बाळ जन्माला आल्यानंतर आईला खारं पाणी पाजावं लागते.
टँकरमध्ये पाणी आणलं होतं
या खाऱ्या पाण्यामुळे किडन्या खराब होतात. पूर्वजांच्या किडन्या या खाऱ्या पाण्यामुळे खराब झाल्या आहेत. ६९ खेड्यातील लोकांनी लोटा लोटा पाणी जमा करून ते टँकरमध्ये टाकलं. ते पाणी घेऊन आम्ही नागपूरला आलो. ते पाणी पिऊन बघावं. त्या पाण्याने आंघोळ करावी, ही आमची विनंती होती.
फडणवीस हे हिंदुत्वाचे राजकारण करतात. त्यामुळे त्यांनी या आंदोलनाची दखल घेणे आवश्यक होतं. पण, तसे त्यांनी केले नाही. आम्ही आणलेले पाणी त्यांनी पाहिले नाही. उलट पोलिसांना प्रचंड दबाव आणला, असा आरोप नितीन देखमुख यांनी केला.