वडापाव खातो, तोडकं मोडकं मराठीही बोलतो; चक्क रशियन मुलगा गिरवतोय जिल्हा परिषदेच्या शाळेत धडे
आई-वडिलांबरोबर पर्यटक म्हणून फिरताना आजगावच्या या शाळेने मात्र त्याला आकर्षित केले. आणि त्याने आई-वडिलांकडे शाळेत प्रवेश करून देण्याचा हट्ट धरला.
सिंधुदुर्ग: कोकणचा कॅलिफोर्निया व्हावा असं कोकणवासियांचं स्वप्न आहे. राजकारणीही अधूनमधून कोकणी माणसाला हे स्वप्न दाखवत असतात. कोण म्हणतो कॅलिफोर्निया व्हावा, कोण म्हणतं सिंगापूर व्हावा तर कोण आणखी काय व्हावा… पण कोकणचा निसर्ग एवढा समृद्ध आहे की भलेभले पर्यटकही कोकणाच्या प्रेमात पडतात. आता रशियातून आलेल्या मिरॉनचीच गोष्ट घ्या ना. अवघ्या 11 वर्षाचा मिरॉन सिंधुदुर्गात आईवडिलांसोबत फिरायला येतो काय आणि इथल्या निसर्गाच्या प्रेमात पडतोय काय… तो केवळ कोकणाच्या प्रेमातच नाही पडला तर त्याने चक्क सिंधुदुर्गातील जिल्हापरिषदेच्या शाळेत प्रवेशही घेतला. सध्या तो तोडकं मोडकं मराठी बोलतो. वडापाव खातोय अन् मित्रांसोबत मस्त हुल्लडबाजी करतोय.
सिंधुदुर्गातील आजगाव गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सध्या गावातील मुलांबरोबरच एक परदेशी चिमुकला अध्ययन करतोय. मिरॉन नावाचा अकरा वर्षाचा मुलगा सहा महिन्यासाठी आई-वडिलांबरोबर पर्यटक म्हणून रशियाहुन सिंधुदुर्गात आलाय.
आई-वडिलांबरोबर पर्यटक म्हणून फिरताना आजगावच्या या शाळेने मात्र त्याला आकर्षित केले. आणि त्याने आई-वडिलांकडे शाळेत प्रवेश करून देण्याचा हट्ट धरला. आता गेले महिनाभर मिरॉन येथील मुलांबरोबर चक्क मराठीमध्ये शिक्षण घेतो आहे. वर्गातील मित्रांबरोबर खेळांमध्ये आणि कवायतींमध्ये रमतो आहे. विशेष म्हणजे मित्रांबरोबर संवाद साधताना भाषेचा कोणताही अडसर त्याला जाणवत नाही.
मराठीतले काही शब्द तसेच अंक तो लिहिण्या बोलण्यासाठी शिकला आहे. येथील भाषा, संस्कृती, खाद्यपदार्थांवर तो प्रेम करू लागला आहे. त्याचा आवडता खाद्यपदार्थ वडापाव आहे. शाळेतली प्रार्थना देखील त्याने पाठ केली आहे. शाळांमध्ये दिला जाणारा पोषण आहार सुद्धा तो आवडीने खातो.
चार महिन्यानंतर त्याला रशियात परत जावे लागणार आहे. परंतु पुन्हा संधी मिळाली तर मी नक्कीच परत येईन, असा विश्वास देखील तो व्यक्त करतो आहे. त्याची भारतीय भाषा शिकण्याची आवड बघून त्याला जिल्हा परिषद शाळेत तात्पुरता प्रवेश देण्यात आला आहे.
भारतीय शिक्षण धोरणानुसार प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार देण्यात आला आहे आणि याचे पालन ही जिल्हा परिषद शाळा करत आहे. भारतीय समाज जीवनाशी एकरूप झालेला मिरॉन खऱ्या अर्थाने भारत – रशिया मैत्रीचा छोटा दूत आहे.