उरल्या फक्त आठवणी… आता ते कधीच भेटणार नाहीत; आजपासून इर्शाळगडावरील शोधकार्य बंद
प्रचंड पाऊस पडत असल्याने या ठिकाणी चिखल झाला आणि त्यामुळे शोधकार्यात अडचणी येऊ लागल्या. एनडीआरएफच्या चार टीम, अकूशल कामगार आणि आजूबाजूच्या गावातीला लोकांनी युद्धपातळीवर मातीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू केलं.
खालापूर | 24 जुलै 2023 : इर्शाळवाडीत तब्बल चार दिवस पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत सुरू केलेलं शोधकार्य आजपासून थांबवण्यात आलं आहे. दुर्घटनास्थळी कोणतीही मशीन किंवा वाहने नेता येत नसल्याने एनडीआरएफच्या जवानांनी कुदळ, फावडं घेऊन या ठिकाणी शोध मोहीम हाती घेतली होती. पण पाऊस आणि चिखलामुळे मदतकार्यात अडथळे येत होते. आव्हान खूप मोठं आणि साधने अपुरी यामुळे अखेर हे शोधकार्य थांबवण्यात आलं आहे. त्यामुळे आता जे लोक बेपत्ता झालेत, चार दिवसानंतरही सापडले नाहीत, ते आता कधीच भेटणार नाहीत. त्यांच्या फक्त आठवणीच आता पीडितांच्या उरात राहणार आहेत.
इर्शाळवाडीतील मृतांचा आकडा 29 वर गेला आहे. अजूनही या दुर्गटनेतील 52 जण बेपत्ता आहेत. आतापर्यंत 119 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. मात्र, आता बचावकार्य थांबवल्याने बेपत्ता झालेली माणसं आता पुन्हा कधीच भेटणार नाहीत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मृतांच्या कुटुंबीयांशी चर्चा करून मदतकार्य थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. आता जे वाचलेत त्यांचं पुनर्वसन करण्यावर जोर देण्यात येत आहे. या लोकांच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात येत आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
वीज, पाणी द्या
दरड दुर्घटनेतील 43 कुटुंबाची तात्पुरत्या निवारा केंद्रात राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या सर्वांना बसमधून सुरक्षित ठिकाणी आणण्यात आलं आहे. त्यांची 50 कंटेनेरमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. हे सर्व लोक तीन महिने या ठिकाणी राहणार आहेत. या सर्व 43 कुटुंबीयांना तीन महिन्यांचं रेशनही शासनाने दिलं आहे. मात्र, आम्हाला वीज आणि पाणी द्यावं, अशी मागणी या पीडितांनी केली आहे.
काय घडलं?
इर्शाळवाडी येथे डोंगराचा कडा तुटून थेट वस्तीवर येऊन आदळला. या डोंगरकड्यासोबत मोठमोठे दगड, मातीचा प्रचंड ढिगारा आणि महाकाय वृक्ष घरंगळत खाली आले. त्यांच्यासोबत इर्शाळवाडीतील घरे आणि घरातील माणसे वाहून गेली. काही या ढिगारा आणि दगडाखाली दबली. अनेक लोक ढिगाऱ्यासह दूरवर जंगलात घरंगळत गेली आणि तिथेच गाडली गेली.
प्रचंड पाऊस पडत असल्याने या ठिकाणी चिखल झाला आणि त्यामुळे शोधकार्यात अडचणी येऊ लागल्या. एनडीआरएफच्या चार टीम, अकूशल कामगार आणि आजूबाजूच्या गावातीला लोकांनी युद्धपातळीवर मातीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू केलं. पण चार दिवसाच्या प्रयत्नानंतर केवळ 29 मृतदेहांचा शोध घेण्यातच त्यांना यश आलं आहे.
सरकारने पावलं उचलावीत
दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी या दुर्घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इर्शाळवाडी सारख्या घटना महाराष्ट्रात वारंवार घडत आहेत. पूर्वी माळीण सारखी घटना घडली, अशा स्वरूपाच्या घटना घडू नये म्हणून सरकारने संशोधन समिती नेमून त्या संदर्भात रिसर्च करण्याची आवश्यकता आहे.
यामधून कायमची उपाययोजना झाली पाहिजे. संरक्षक भिंत बांधणं, त्या लोकांचं पुनर्वसन करणे आदी गोष्टी सरकारने प्राधान्याने घेतल्या पाहिजे. अन्यथा अनेक शेकडो लोकांचे जीव त्या ठिकाणी जातील. आपल्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहत राहण्याशिवाय काहीच राहणार नाही, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.