कांदा लिलाव बंद पाडले, शेतकऱ्यांनी मुंबई- आग्रा महामार्ग रोखून धरला, वाहतूक ठप्प; केंद्रीय मंत्र्यांची मध्यस्थीही फेल
दरम्यान, कांद्यावर लावलेले निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी बीआरएस पक्षाकडून नगरमध्ये आंदोलन करण्यात आले. नगरच्या नेप्ती कांदा मार्केटमध्ये बीआरएस नेते घनश्याम शेलार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
नाशिक | 24 ऑगस्ट 2023 : केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी कांदाप्रश्नी स्वत: लक्ष घालून व्यापारी आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यामुळे आजपासून कांदा लिलाव सुरू होणार असल्याचे संकेत मिळत होते. राज्यातील सर्व भागात कांदा लिलाव सुरूही झाले. पण काही भागात शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन करत कांदा लिलाव बंद पाडले. नाशिकमध्ये तर शेतकरी अधिक आक्रमक झाले होते. यावेळी शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडून थेट मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको केला. तब्बल दोन तासांपासून शेतकऱ्यांना चक्का जाम केला आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला आहे. तर शेतकरी तसूभरही मागे हटायला तयार नसल्याने शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.
नाशिकच्या चांदवड बाजार समितीत सकाळीच कांदा लिलाव सुरू झाला. कांद्याच्या 150 गाड्या लिलावासाठी बाजार समितीत दाखल झाल्या. त्यामुळे कांदा लिलाव आजपासून सुरळीत सुरू होणार असल्याची चिन्हे होती. मात्र, शेतकऱ्यांनी या लिलावाला विरोध केला. नाफेडचे अधिकारी हजर नसल्याने शेतकरी संतापले होते. नाफेड मार्फत होणारी खरेदी थेट बाजारात करण्याची मागणी लावून धरत शेतकऱ्यांनी प्रचंड गोंधल घातला. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव पुन्हा ठप्प झाला. शेतकऱ्यांनी पिंपळगाव, चांदवडपाठोपाठ लासलगावमध्येही कांदा लिलाव बंद पाडला.
नाफेड कुठे आहे?
लासलगाव बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले होते. लिलावात 1700 ते 1800 रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. कांद्याचे लिलाव बंद पाडत, नाफेडने प्रत्यक्षात लिलाव करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी शेतकर्यांनी नाफेडच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नाफेड आहे कुठे? असा सवालही शेतकऱ्यांनी यावेळी केला.
भर पावसात ठिय्या
चांदवड बाजार समितीत शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. यावेळी नाफेड विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला. त्यामुळे बाजार समिती आवारात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. भर पावसात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू होते.
वाहनांच्या रांगाच रांगा
त्यानंतर या शेतकऱ्यांनी थेट मुंबई- आग्रा महामार्ग रोखून धरला. गेल्या 2 तासंपासून मुंबई-आग्रा महामार्ग ठप्प झाला आहे. शेतकऱ्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजीही द्यायला सुरुवात केली आहे. महामार्गच रोखून धरल्याने चांदवडमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. नाफेडचे अधिकारी उपस्थित नसल्याने शेतकरी अदिक आक्रमक झाले आहेत. चांदवड चौफुलीवर हा शेतकऱ्यांचा चक्काजाम सुरू आहे.