छगन भुजबळ यांना मोठा धक्का, निष्ठावंत नेता, माजी नगराध्यक्ष 11 माजी नगरसेवकांसह भाजपमध्ये?; नाशिकमध्ये मोठी उलथापालथ
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय आणि सटाण्याचे माजी नगराध्यक्ष सुनील मोरे लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यांच्यासोबत 11 माजी नगरसेवकही भाजपमध्ये जाणार असल्याने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
नाशिक : नाशिक महापालिकेची निवडणूक कधीही होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच नाशिकच्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नाशिकमध्ये येऊन गेले. त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि माजी नगराध्यक्ष सुनील मोरे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मोरे यांनी बावनकुळे यांची भेट घेतली होती. त्यानंतर या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. मोरे भाजपमध्ये आल्यास नाशिकच्या राजकारणात फार मोठे बदल होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
माजी नगराध्यक्ष सुनील मोरे हे छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय आहेत. नाशिकच्या सटाणा येथील शहर विकास आघाडीचे मोरे हे संस्थापक आहेत. तसेच सटाण्याचे ते माजी नगराध्यक्ष आहेत. या शिवाय छगन भुजबळ चालवत असलेल्या समता परिषदेचे ते माजी ग्रामीण जिल्हाप्रमुख आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सटाणा दौऱ्यावेळी मोरे यांनी बावनकुळे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
11 नगरसेवकही फुटणार
मोरे यांच्या प्रवेशाने भाजपला नाशिक ग्रामीणमध्ये मोठी ताकद मिळणार आहे. शहर विकास आघाडीचे 11 माजी नगरसेवक आणि शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. मोरे यांच्याकडूनच या वृत्तास त्यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे मोरे यांचा भाजप प्रवेश जवळजवळ निश्चित झाल्याचे मानले जात आहे. फक्त प्रवेशाची तारीख ठरायची बाकी असल्याचंही सांगितलं जात आहे.
भाजपमध्ये नाराजी
मोरे यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून सर्वच मातब्बरांना धोबीपछाड देत निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली होती. त्यांनी सटाणा शहराच्या इतिहासात कोट्यवधींची विकास कामे खेचून आणली होती. मोरे यांच्या भाजप प्रवेशाने भाजपला बळ मिळणार असलं आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसणार असला तरी मोरे यांच्या प्रवेशावर स्थानिक भाजप नेते नाराज आहेत. सटाणा शहर आणि तालुक्यातील भाजप नेत्यांमध्ये मोरे यांच्या नाराजीचा सूर दिसतोय. मोरे यांच्या राजकीय वचर्स्वामुळे त्यांना महत्त्व मिळणार असल्याने ही नाराजी दिसून येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.