शरद पवार हे अजितदादा यांना साथ देणार?; छगन भुजबळ यांचं शरद पवार यांना साकडं काय?
काही मंडळी पराचा कावळा करतात. राजकारणात विकास हा महत्त्वाचा असतोच, पण भावना आणि तत्त्व देखील महत्त्वाचे असतात. अनेक लोकं ही भावनेने जोडली जातात. त्यासाठी मताचा विरोध मताने करायला हवा, असं छगन भुजबळ म्हणाले.
नाशिक | 25 ऑगस्ट 2023 : अजित पवार हे आमचेच नेते आहेत. राष्ट्रवादीत कुठेही फूट पडलेली नाही, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज जाहीर केलं. त्यामुळे शरद पवार यांनी अजितदादा यांना माफ केलं असल्याचं सांगितलं जात आहे. शरद पवार यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्हीही तेच म्हणतोय. आता आम्हालाही तुम्ही समर्थन द्या, असं साकडंच छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना घातलं आहे.
शरद पवार यांच्या वक्तव्याचं मी स्वाग करतो. आमचीही तिच भूमिका आहे. अजित पवार हे आमचे नेते आहेत. दादा जसे नेते आहेत. तसेच भुजबळ आणि मुंडे हे सुद्धा कार्यकर्ते आहेत. आम्हीही तेच म्हणतोय. म्हणून आम्ही शरद पवार यांना भेटलो होतो. आमच्यात फूट नाही, फक्त एक गट सरकारमध्ये सामील झाला आहे. तुम्हीही समर्थन द्यावे एवढंच आमचं म्हणणं, असं सांगतानाच आम्ही पक्ष सोडलेला नाही. आमची निशाणी घड्याळच आहे. आमचा झेंडा तोच आहे, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
कांद्याचे भाव वाढतील
कांदाप्रश्नावरही त्यांनी भाष्य केलं. मी पीयूष गोयल यांच्याशी बोललो. बाजार समितीच्या लोकांशी बोलतोय. लिलाव सुरू आहे. व्यापारी येत आहेत. नाफेड पण खरेदी करतंय. हळूहळू सर्व सुरळीत होईल. 2 लाख टन कांदा घ्यायचा असेल तर नाफेडचे केंद्र वाढवायला पाहिजे. सध्या नाफेडचे 32 केंद्र आहेत. केंद्र मार्केट जवळ असावे. व्यापारी आणि नाफेड केंद्राच्या लोकांची बोलणी सुरू आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होतंय. त्याचे दुःख आहेच. भाव पुढे वाढतील अशी अपेक्षा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
भाजपकडून समाजमाध्यमांचा मोठा उपयोग
2014मध्ये भाजपने समाज माध्यमांचा मोठा उपयोग करून घेतला होता. समाजमाध्यमांचा असा उपयोग करून घेता येतो असा विचार देखील कुणी केला नव्हता. मी जर ऑनलाईन भाषण केलं, तर लाखो लोकांशी बोलू शकतो. मागच्या आठवड्यात मी माझं म्हणणं मांडलं. त्याच्यावरून आता सुरुवात झाली, असं त्यांनी सांगितलं.
मुद्दा तो नाहीच
यावेळी त्यांनी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यावरही टीका केली. संभाजी भिडे हे मनोहर कुलकर्णी आहे की नाही? मी म्हणालो शक्यतो संभाजी, शिवाजी असं नावं ब्राह्मण समाजात नसतात. मग ते म्हणाले, नावं आहे. पण वाद तो नाहीच. संभाजी भिडे हा मुद्दा आहे. पण ते वेगळ्या पद्धतीने पसरवण्यात आले. हे आंदोलन, ते आंदोलन सुरू झालं. मते बनवण्यासाठी या समाज माध्यमांचा उपयोग होत आहे, असा दावाही त्यांनी केला.
भुजबळांचं शिक्कामोर्तब
मंत्र्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील मृत्यूप्रकरणावरून जाब विचारल्याचं सांगितलं जात आहे. त्यावरही भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अजितदादा यांनी विचारलं 18 लोकं का दगावले? पण ही फक्त चर्चा होती. लगेच दुसरी चर्चा सुरू झाली. पण हे सगळं पसरवणारे यंत्र तुमच्या हातात आहे, असं सांगत अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारल्याच्या वृत्तावरच भुजबळ यांनी शिक्कामोर्तब केलं आहे.