नागपूर | 28 ऑगस्ट 2023 : अजित पवार हे 40 आमदारांसह महायुतीत आले. राज्यातील शिंदे-भाजप सरकारमध्ये ते सामीलही झाले. राज्याचं उपमुख्यमंत्रीपदही त्यांना मिळालं. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. थेट शरद पवार यांच्या नेतृत्वालाच आव्हान देऊन अजित पवार हे भाजपसोबत आल्याने चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. एकनाथ शिंदे यांना डच्चू देऊन अजितदादांकडे राज्याची सूत्रे दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. राजकीय वर्तुळात तशी चर्चा रंगली आहे. ही चर्चा सुरू असतानाच राज्यातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे.
सध्या राज्यात बैल गाडी एकाची, बैल दुसऱ्याचा आणि हाकलणारा तिसराच आहे. यामुळे कुणाची लॅाटरी लागेल माहीत नाही. शरद पवार आल्याशिवाय अजितदादांना मुख्यमंत्रीपद नाही हीच भाजपची अट आहे, असा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या दाव्याबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. निवडणूक आयोगाचा निर्णय गुप्तपणे झाला असेल. तो प्रफुल्ल पटेल यांना माहीत असेल. केंद्र सरकारच्या आशीर्वादाने पक्ष बळकवण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
अजित पवार यांच्या कालच्या बीडच्या सभेवरही त्यांनी टीका केली. जबरदस्तीने आणलेली लोकं सभेत होती. त्यांच्या सभेत मरगळ होती. तर उद्धवजींच्या सभेत जिवंतपणा होता, असं सांगतानाच राष्ट्रवादीच्या सभेत काय सांगणार? बेईमानी केली म्हणून सांगणार का?, असा सवाल त्यांनी केला.
युतीचं सरकार आलं आणि आमच्या मतदारसंघातील कामांना स्थगिती दिली. पण आता यांच्यात लाथाळ्या वाढेल, हे एक दुसऱ्यांचे कपडे फाडतील, असा दावाही त्यांनी केला.
अनेक भागात दुष्काळी स्थिती आहे. भविष्यात पाण्याची टंचाई होईल. पण सरकार सभा आणि प्रतिसभांमध्ये गुंतलंय. याकडे लक्ष द्या नाही तर लोक फिरू देणार नाहीत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पॅकेजची मागणी करावीच लागेल. नाही तर यांनी पळता भूई कमी होईल. मी दुष्काळी भागाचा दौरा करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.