हिंगोली | 28 ऑगस्ट 2023 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालच्या सभेवरून शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांची सभा म्हणजे येड्याची जत्रा आहे, अशी टीका संतोष बांगर यांनी केली आहे. तसेच शिंदे गटाने माझा बाप चोरला. ही बाप चोरणारी टोळी आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेचाही बांगर यांनी समाचार घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे हे आमच्या सर्वांचे आहेत. त्यामुळे आमचा बाप चोरला असं कुणीही म्हणू नये, असं प्रत्युत्तर बांगर यांनी मीडियाशी संवाद साधताना दिलं आहे.
संतोष बांगर यांनी कावड यात्रा काढली. यावेळी ते बोलत होते. आमचा बाप चोराला हे म्हणणं आता बंद करावं. एखादा म्हणेल आता आमचा देव चोरला म्हणून मग महादेव कुणी एकाचे होतात का? त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे हे आमचे सर्वांचे आहेत. त्यामुळे कुणीही म्हणू नये की ते आमचे बाप आहेत. बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्राचे बाप आहेत, असा पलटवार संतोष बांगर यांनी केला.
हिंदुत्ववादी विचारांचा समाज हा कावड यात्रेनिमित्त एकत्र येत असतो. श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी दरवर्षी ही कावड यात्रा आम्ही काढत असतो. या कावड यात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने शिवभक्त सामील होत असतात. आपण ही गर्दी पाहा. उद्धव ठाकरे यांची कालची सभा संपलेली आहे. त्यामुळे तो विषय मिटला. परंतु उद्धव ठाकरेंनी आजच्या कावड यात्रेची गर्दी पाहावी. मग उद्धव ठाकरे यांनीच आपल्या छातीवर हात ठेवून सांगावं ही ताकद कोणाची? असा सवाल त्यांनी केला.
गेल्या 38 वर्षांपासून मी शिवसेनेत आहे आणि गेल्या 14 वर्षापासून मी जिल्हाप्रमुख या पदावर ते काम करतोय. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांना मी गुंड वाटलो नाही का? मी गुंड आहे. मी गोंडूस आहे म्हणून. त्यावेळेस हेच उद्धव ठाकरे म्हणायचे की बाळासाहेबांचा शिवसैनिक असाच पाहिजे. ज्या शिवसैनिकांच्या अंगावर केस नाही ते माझे शिवसैनिक होऊच शकत नाही, असे बोलणारे देखील हेच उद्धव ठाकरे आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
आता जिल्ह्यातील चांडाळ चौकडी माझ्या विरोधात जमलेली आहे. परंतु आता झालेला त्यांचा जिल्हाप्रमुख हा चार पक्ष बदलून आलेला आहे. त्यांच्याकडे जमलेली लोकं बजबज नालीमध्ये बुडालेली आहेत. उद्धव ठाकरे यांनी काल येड्यांची जत्रा उभी केलेली होती. येड्यांचं तुम्हाला माहीत आहे, त्यांच्या अंगावर कोणी पळून गेलं ते भुर्रकन पळून जातात. त्यामुळे आमच्या शिवसेनेवर या येड्यांचा कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा त्यांनी केला.
राष्ट्रवादीसोबत जरी आता आम्ही सत्तेत बसलो तरी राष्ट्रवादी स्वतः या सत्तेत सामील झालेली आहे. त्यांना मोदींचे नेतृत्व मान्य झालेलं आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी देखील हिंदुत्वाचा नारा देणार आहे, असं सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काम राज्यातील जनता पाहत आहे. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत आणि यापुढे देखील तेच मुख्यमंत्रीपदी राहतील. असा मुख्यमंत्री होणे नाही, असंही ते म्हणाले.