ईव्हीएम मशीन्स नागपुरात पोहोचल्या, निवडणूक आयोगाच्या हालचालींना वेग; संकेत काय?
राजकीय पक्षांप्रमाणेच केंद्रीय निवडणूक आयोगानेही लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ईव्हीएम मशीन्स आल्याने निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे.
नागपूर | 19 ऑगस्ट 2023 : इंडिया आघाडी आणि एनडीएने लोकसभा निवडणुकीची जोरात तयारी सुरू केली आहे. कोणत्याही आघाडीत नसलेल्या राजकीय पक्षांनीही निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीनेही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. दोन्ही आघाड्यांच्या जोरबैठका सुरू आहेत. मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. प्रत्येक जिल्ह्यात सभा घेण्यावरही भर दिला जात आहे. राजकीय पक्षच काय, निवडणूक आयोगही निवडणुकीच्या कामाला लागला आहे. नागपूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालायत ईव्हीएम मशीन्स आल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणुकीचे पडघम वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानं, राज्यातील सर्वच जिल्हा प्रशासनाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारी सुरु केली आहे. नागपूर जिल्ह्यात नवीन मतदार नोंदणी, जिल्ह्यात दाखल झालेल्या ईव्हीएमच्या तांत्रिक अडचणी दूर करणे आणि नवीन पक्षाचे चिन्ह ॲड करण्याबाबतची प्रक्रिया सुरु झाली आहे.
75 हजार मतदार नोंदणीचं टार्गेट
ईव्हीएम मशीन्स नागपूर जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. त्याचं प्रिपरेशन सुरु आहे. नोव्हेंबरपर्यंत प्रारुप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. एप्रिलमध्ये लोकसभा निवडणूक जाहीर झाली तरीही प्रशासनाने तयारी पूर्ण केलीय. नवीन मतदार नोंदणी वेगानं सुरु असून यंदा 75 हजार मतदार नोंदणीचं टार्गेट आहे, अशी माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी दिली.
प्रत्येक जिल्ह्यात निवडणुकीची तयारी
मार्च- एप्रिल 2024 मध्ये लोकसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानं प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा प्रशासन लोसकभा आणि विधानसभा निवडणूकीची तयारी करत आहे. यंदाच्या निवडणूकीत नवमतदारांचा कौल महत्त्वाचा असणार आहे. राजकीय पक्ष आणि जिल्हा प्रशासन नवीन मतदार नोंदणी आणि मृतक मतदारांचे नावं यादीतून कमी करण्याची प्रक्रिया वेगानं करत आहे. एकट्या नागपूर लोकसभा मतदारसंघात 75 हजार नवीन मतदारांची नोंदणी केली जाणार आहे.
इंडिया आघाडीची बैठक
दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत इंडिया आघाडीची बैठक होत आहे. इंडिया आघाडीची ही तिसरी बैठक आहे. या बैठकीला सहा राज्यांचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि सर्वच पक्षाचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला काँग्रेस नेत्या सोनिया गांधीही उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेसने दिल्लीतील लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आप आणि काँग्रेसचे नेते बैठकीत एकमेकांसमोर येणार असल्याने त्यांच्या चर्चेकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुंबईतील बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.